मनाचिये गुंथी - मनदु:खी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:30 IST2017-08-21T00:29:27+5:302017-08-21T00:30:00+5:30
मित्र म्हणाला, बरं वाटत नाहीये! म्हटलं काय झालं? म्हणाला, दुखतंय! काय? मी विचारलं म्हणाला मन दुखतंय! अरे वा हे अजबच! म्हणजे मन दुखतंय हे कसं कळलं तुला? आणि त्याची लक्षणं काय? तर म्हणाला, कळत नाही, पण दुखतंय खरं! विचार केला हे काव्यमय आहे, पण हा तर कवी नाही.

मनाचिये गुंथी - मनदु:खी
- किशोर पाठक
मित्र म्हणाला, बरं वाटत नाहीये! म्हटलं काय झालं? म्हणाला, दुखतंय! काय? मी विचारलं म्हणाला मन दुखतंय! अरे वा हे अजबच! म्हणजे मन दुखतंय हे कसं कळलं तुला? आणि त्याची लक्षणं काय? तर म्हणाला, कळत नाही, पण दुखतंय खरं! विचार केला हे काव्यमय आहे, पण हा तर कवी नाही. म्हणजे हे असं झालं पोटात गरगरतंय, डोकं खळखळतंय, कान ओढताहेत, हातापायांना ऐकू येत नाही. त्या अर्थाने वाऱ्याला उकडतंय, पाण्याला तहान लागलीय, उन्हाला गरम होतंय, थंडी कुडकुडते आहे. म्हणजे हे सारंच काव्यमय. वरवर आपलं नसणारं पण तरीही आपलंसं केलेलं. एखाद्या घटनेशी आपला संबंध तसा नसतो, पण वाईट वाटतं. मग तशाच पद्धतीची दुसरी घटना घडली की पहिल्या घटनेतील परिणाम दुसऱ्या वेळी उफाळून येतात. वाटतं हे सारं आज पुन्हा समोर आलंय. मग मनावर या घटनांचे आघात होतात, माणसं विरुद्ध होतात. एखाद्या अगदी जवळच्या मित्राचा, मुलाचा, मुलीचा अवचित मृत्यू होतो. त्या घटनेची जखम खोलवर होते. मग एखाद्या बातमीने हे दु:ख मळमळू लागतं. काही जखमांच्या खपल्या तात्कालिक असतात. त्या निघायला कायम उत्सुक असतात. त्यातूून मनाची एक ठेवण होते. त्या व्यक्तीची स्मृती आपल्याला कायम होत राहते. अशा आठवणी त्रासदायक तर असतातच, पण संपत नाहीत. यावर ठरवून विस्मृती हा पर्याय असू शकतो. म्हणजे आपल्याला एखादी दिलखुलास व्यक्ती विनोद सांगत असते. प्रथम आपण कान टवकारतो. पूर्ण विनोद कुणी सांगितला तर माफक हसतो, ऐकलाय म्हणतो. वारंवार ऐकला तर हसणं थांबतंं. म्हणजे हसण्यालाही नवीनता यावी लागते. विषय नवे हवे असतात. मग दु:खाच्या एकाच कारणाने आपण वारंवार दु:ख का करतो? दु:खित का होतो. त्या स्मृती फक्त आठवणी का राहत नाहीत. दु:ख, वेदना चिरंतन आहेच, पण कोणत्या कारणाने किती हळहळायचं हे ठरवायला हवं. असं म्हणतात लोकोत्तर पुरुष कठोर होते. म. गांधी, लो. टिळक यांचे पुत्राबाबतचे अनुभव आहेत. त्यांना दु:ख होत नसेल पण त्यांनी त्याचं भांडवल केलं नाही. ते जिरवलं, पचवलं, गिळलं. त्यांना दु:ख नव्हतं असं नाही. गायकाचा मुलगा गायक होतोच असं नाही. एखाद्या बड्या कंपनीच्या मालकाचा मुलगा प्रयत्नाने, सरावाने कंपनी वाढवू शकतो. परंतु कला ही उपजत लागते. तिला वाढवणे प्रत्येकाच्या हातात. म्हणजे एखाद्या महान कलाकाराचा मुलगा अगदी किरकोळ कलाकार असतो किंवा उलटही घडते, मग आपण बापसे बेटा सवाई म्हणतो. म्हणजे परमेश्वर देताना सगळं सारखं देत नाही. वशिलेबाजी करतोच म्हणतात. एखाद्या निस्सीम भक्ताला अपार वेदना देतो तरीही तो कर्मापासून दूर होत नाही आणि एखादा मोत्यामगत असतो तो आयुष्यभर उडाणटप्पूच राहतो त्याला काहीच होत नाही. मनाचं असंच आहे. ते सर्वांनाच आहे, पण प्रत्येकाचं दुखतं असं नाही. खरंतर कुणाचंच दुखू नये, पण ज्याचं दुखतं त्यालाच कळतं हे मात्र खरं !