धुळ्यात़़़ गुंडाराजच चालतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 13:30 IST2018-06-18T13:30:10+5:302018-06-18T13:30:10+5:30

धुळ्यात़़़ गुंडाराजच चालतोय
धुळ्यात गेल्या वर्षभरात कुख्यात गुंड गुड्डयाच्या खुनाच्या घटनेनंतर सुरु झालेली खुनाची मालिका आणि गेल्या आठवड्यात घडलेल्या धुळे व शिंदखेडा येथील पोलिसांवरील हल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यात पोलीसच असुरक्षित आहे, असे दिसते. सर्वसामान्य जनता ज्यांच्या विश्वासावर आपल्याला सुरक्षित समजतात. तेच स्वत: असुरक्षित आहे. मग सर्व सामान्य जनतेच्या सुरक्षितता तर राम भरोसेच म्हणावी लागेल.
शिंदखेडामध्ये मध्यरात्रीच्या वेळेस हातात दंडुके घेऊन मद्यधुंद तरुण थेट पोलिस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाºयांवर हल्ला चढवून त्यांना जखमी करतात. धुळयात भर रस्त्यावर काही गुंड पोलिस कर्मचाºयाच्या कानशिलात लगवितात, अशा घटना पाहून जिल्ह्यात खाकीचा धाक संपला, या विचाराने नागरिक भयभीत होणे साहजिकच आहे आणि झालेही तसेच आहे. शहरात दररोज ग्रामीण भागातून प्राथमिक पासून महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असतात. धुळयातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना पाहता ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांना दररोज धुळयात पाठविताना त्यांच्या सुरक्षेच्या द्दष्टीकोनातून असुरक्षित समजू लागले आहे. कारण धुळ्यात केव्हाही भर चौकात, रस्त्यावर आणि कॉलनी परिसरात भरदिवसा सर्वांच्या डोळयादेखत खुन होतात. कोणत्याही कारणावरून बसेसवर दगडफेक होते. लगेच वाहतूक शहराबाहेरुन वळविली जाते. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विध्यार्थ्यांना रोजच्या बस थांब्यावर न उतरता दुसºयाच ठिकाणी किंवा बस स्थानकावर उतरावे लागते. तेथून तो शाळेवर पोहचेपर्यंत आणि सायंकाळी परत घरी पोहचेपर्यंत पालकाचा जीव टांगणीला असतो. अशा घटनांची पुनरावृत्ती वारंवार घडत असल्याने पोलिस काय करत आहेत, असा प्रश्न पालक व पाल्यांना पडला आहे. हीच परिस्थिती धुळयातील नागरिकांची आहे. त्यांच्याही मनात असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की शहरात काही घडल्याची नुसती अफवा ही पसरली तरी नागरिकांचा जीव मुठीत येतो. धुळयाच्या सामाजिक सुरक्षेला धोका म्हणून हद्दपार केलेले गुंड सर्रासपणे पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात फिरताना दिसतात. हे तर अशा हद्दपारीत गुंडांना पकडून पोलिसांनी स्वत:च त्याचे प्रमाण दिले आहे. हद्दपार केलेले गुंड शहरात येतातच कसे? पोलिसांना ते घाबरत नाही का, असा प्रश्न धुळयात येणाºया नवीन व्यक्तीला पडतो. त्याचे उत्तर धुळेकर पटकन देतात की हे नेहमीचे आहे, कारण त्या गुंडाचे लागेबांधे खाकीपासून खादीपर्यंत सर्वांशी आहे. त्यामुळे काहीच होणार नाही, असे ठामपणे सांगतात. शहरात कावळ्याच्या छत्री प्रमाणे सोशल क्लबच्या गोंडस नावाखाली ठिकठिकाणी जुगाराचे अड्डे चालतात. हे त्या परिसरात राहणाºया प्रत्येक नागरिकाला माहिती असते. मग त्या भागातील पोलिसांना कधीच माहित होत नाही, हे कसे शक्य आहे. तर हे सहज शक्य होते. कारण त्या सोशल क्लब चालविणाºयाकडून ठरलेला मलिदा हा वेळेवर त्यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर याची माहिती पोलिसांना कशी राहणार. असे क्लब चालविणारेच मग भाई बनतात. येथूनच मग भाईचा उदय होतो. या भाईला मग सर्वच सलाम करतात. त्याची एन्ट्री प्रत्येक ठिकाणी एकदमच धमाकेदार असते. मग ते सार्वजनिक उत्सव असो की पोलीस स्टेशन असो. कुठे ही बुलेट आणि महागड्या मोटार सायकलवर आलेली तरुणांची फौज त्याच्यासोबत असते. पोलीस स्टेशनला आपल्या वरिष्ठ अधिकार्यांना सलाम ठोकण्यात कानाडोळा करणारे खाकीतील काही कर्मचारी भाईला मात्र न विसरता सलाम ठोकतात. भाईला मोठया साहेबांच्या कॅबिनला सरळ एन्ट्री मिळते. भार्इंचे लक्ष आपल्याकडे जावे म्हणून जी धडपड त्याठिकाणी उपस्थित सर्वांचीच असते. ते पाहून सर्व सामान्य नागरिकाला आणि तरुणांना त्याचा हेवा वाटतो. अशा भाई विरोधात तक्रार कोणी केली तर कारवाई होण्याआधीच त्याची माहिती भाई पर्यंत पोहचते. मग त्या व्यक्तीला त्याचे जे परिणाम भोगावे लागतात ते पाहून पुन्हा कोणाची तक्रार करण्याची हिम्मत होत नाही. अशा भाईला राजकीय पाठबळ ही मिळते. आपोआपच अशा भार्इंची भीती सर्वसामान्यामध्ये पोलिसांपेक्षा जास्त निर्माण होते. खाकीची जरब इथेच संपते. अशा भार्इंचे कोणीही काही बिघडवू शकत नाही, असे दिसू लागल्याने मग तरुणांची एक फौज उभी राहते. ते मग भार्इंचा माणूस म्हणून पोलिसांना मानत नाही. कोणी पोलिसाने कारवाई केली तरी अवघ्या काही तासात ते बाहेर येतात. यामुळे या तरूणांची आणखी हिम्मत वाढते आणि मग ते पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत हिम्मत करतात. कारण त्यांना भाई सोडवून आणेल, याची खात्री असते. असे नवनवीन भाई दिवसागणिक धुळ्यात तयार होत आहे. त्यामुळे यांच्यात आपले वर्चस्व वाढविण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. त्याचा परिणाम ते एकमेकाविरुध्द उभे राहिलेले दिसतात. त्यातून मग टोळी युध्द आणि भरचौकात भरदिवसा एकमेकांवर हल्ला करुन खून पाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यावर अंकुश ठेवण्यात पोलीस मात्र आता अपयशी ठरतांना दिसत आहे. कारण साधारण गुंडाचा भाई बनलेल्यांचे हे भूत आता पोलिसांच्या मानगुटीवर बसले असून त्याला आवर घालणे त्यांच्या ही आवाक्याबाहेर होत असल्याचे दिसते. यामुळे धुळयातील गुंडगिरी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. खाकीचा धाक या गुंडांमध्ये कमी झाला असे म्हणण्याऐवजी शिल्लकच राहिलेला नाही, असेच म्हणावे लागेल.
आता यावर अंकुश ठेवायचे असेल तर पोलिसांनी गुंडगिरी करणारा कोणीही असला तरी त्याच्यावर कुठलाही मुलाहिजा न बाळगता कारवाई करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. कोणावरही कारवाई करण्यासाठी अथवा ती थांबविण्यासाठी राजकीय पुढाºयांचा दबाव न जुमानता काम केले पाहिजे. शहरातील गुंडगिरीला खतपाणी घालणारे सट्टा, जुगार, बनावट दारू, बनावट पिस्तूल विक्रीचा व्यवसायाचा समूळ उच्चाटन केले पाहिजे. असे व्यवसाय करणाºयावर मग ते कोणी असो त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.
शहरात वाहतुकीचे नियम मोडणाºया सर्वसामान्य नागरिकांपासून विनानंबरची बुलेट सुसाट वेगाने घेऊन जाणाºया त्या भाईवरही न घाबरता कारवाई करुन वेळीच त्याच्या वेगावर आवर घातला तरच पोलिसांची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळेल आणि खाकीची जरब गुंडांवर बसेल. अन्यथा, धुळयात गुंडांचे राज्य आहे, असेच म्हणावे लागले.
- राजेंद्र शर्मा, धुळे