Ramzan : रमजानचा पवित्र महिना सर्वांसाठी  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 01:42 PM2018-05-21T13:42:30+5:302018-05-22T07:15:15+5:30

रमजानवरील या माहितूपूर्ण मालिकेत आज पवित्र अशा रमजान महिन्यात सर्वांसाठीच कसा उपयोगी त्याचे विवेचन.

Ramzan : The holy month for all | Ramzan : रमजानचा पवित्र महिना सर्वांसाठी  

Ramzan : रमजानचा पवित्र महिना सर्वांसाठी  

नौशाद उस्मान

हो, खरंच! रमजान प्रत्येक जातीधर्माच्या माणसासाठी आहे. आता तुम्ही म्हणाल की, रमजानशी एका बौद्धाचा किंवा हिंदूचा किंवा कोणत्याही मुस्लिमेतराचा काय संबंध? पण कुरआन वाचल्यावर समजते की, संबंध आहे! कुरआनात अल्लाह (ईश्वर) सांगतो-
‘‘रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले –   मानवजातीकरिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी.’’
                                                                        - कुरआन (२:१८५)
इथे रमजान महिन्यात कुरआन अवतरीत झाला असून तो फक्त मुसलमानांकरीताच नव्हे तर सकल मानव समाजाकरीता अवतरीत झाल्याचं दस्तूरखुद्द कुरआनाचा लेखक असलेला अल्लाह (ईश्वर) सांगतोय. याचा अर्थ कुरआनचा संबंध फक्त मुसलमानांशी नसून समस्त मानवांशी आहे. तसेच कुरआन अवतरणामुळेच पावन झालेला रमजान हा अरबी कॅलेंडरचा नववा महिनादेखील बौद्ध, हिंदू, जैन, ब्राह्मण, खिश्चन, बहुजन, शिख, पारसी म्हणजेच सर्वांसाठी मंगलमय आहे. फक्त उर्दू, अरबी किंवा फारसी भाषिकांसाठीच नव्हे तर आम्हा मराठी बांधवांकरिताही हा रमजान एक संदेश घेऊन आलाय. तो संदेश, तो ग्रंथ सर्वांसाठी असला तरी काही संकुचित वृत्तीचे लोकं ते लपवून ठेवतात. आमच्या देशबांधवांचा तो हक्क आहे की, या पावन महिन्यात त्यांच्याच निर्मात्याकडून अवतरीत झालेल्या संदेशाला, ग्रंथाला म्हणजेच कुरआनला त्यांनी वाचावं, त्यावर चिंतन-मनन करावं आणि काही शंका असली तर सुज्ञ लोकांना विचारून त्याचं निरसन करून घ्यावं. 
बऱ्याच वेळा राजकीय पक्षदेखील इफ्तार पार्ट्या आयोजित करतात. पण त्यांचा उद्देश वेगळा असतो, असो. पण सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बौद्धिक मेजवाणीदेखील मिळते. यावेळी कुरआन व इतर इस्लामी साहित्त्य भेट म्हणून मुास्लिमेतर बांधवांना दिले जातात. इफ्तारमधील फराळ व ईद मिलनातल्या शिरकुर्म्यापेक्षाही ही साहिात्यिक मेजवाणी मोलाची असते. रमजाननिमित्त वृत्तपत्र, मासिकात येणारे लेखदेखील वाचनीय असतात. एवढंच नव्हे तर स्वत:ला जेवढी काही अधिकृत माहिती मिळाली, त्याआधारे या विषयावर लेख लिहून ते विविध नियतकालिकांना पाठवलेही पाहिजेत. वेळात वेळ काढून या सुवर्णसंधीचं चीज करा.अनेक  मुस्लिमेतर बांधवदेखील या महिन्यात एक-दोन उपवास ठेवत असल्याचे निदर्शनास येते. त्यांना आरोग्याच्यादृष्टीने त्याचे अनेक फायदे होत असतात. पण उपवासाचा खरा हेतु हा माणसात ईशपरायणता वाढीस लावणे आहे. ईशपरायणता काय आहे, याकरिता तो ग्रंथ वाचला पाहिजे, जो या महिन्यात अल्लाहकडून प्रेषितांवर अवतरला आहे, जो सर्वांकरिता आहे, हा महिनाही सर्वांकरिता आहे. 


(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)
 

 

Web Title: Ramzan : The holy month for all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.