वेतनाअभावी जि.प. शिक्षकांवर कर्जाच्या व्याजाचा नाहक भुर्दंड
By Admin | Updated: April 30, 2016 00:32 IST2016-04-30T00:32:54+5:302016-04-30T00:32:54+5:30
जिल्हा परिषद शिक्षकांना महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन द्यावे, असे शासन निर्देश आहे.

वेतनाअभावी जि.प. शिक्षकांवर कर्जाच्या व्याजाचा नाहक भुर्दंड
कार्यवाहीची मागणी : आंदोलनात हजारो शिक्षक सहभागी होणार
भंडारा : जिल्हा परिषद शिक्षकांना महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन द्यावे, असे शासन निर्देश आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून या नियमाची पायमल्ली होत आहे. परिणामी, शिक्षकांनी घेतलेल्या कर्जाची किस्त थांबली असून त्यांना नाहक व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. याविरूध्द व शिक्षणाधिकारी किसन शेंडे यांच्याविरूद्ध कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने ३ मे रोजी दुपारी १ वाजता जिल्हा परिषदसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
शालार्थ वेतन प्रणालीत वेतन स्वीकारले नसल्याने व शिक्षण विभागाच्या असमर्थ कार्यप्रणालीमुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने वेळोवेळी चर्चा, शिष्टमंडळ, आंदोलन करण्यात आली. प्रत्येकवेळी त्यांना केवळ आश्वासन देण्यात आली. मात्र, वेतनाचा मुद्दा आला की, शिक्षण विभागाची यंत्रणा गप्प राहते, अशी स्थिती आहे.
मार्च महिन्याचे वेतन एप्रिलच्या एक तारखेला व एप्रिलचे वेतन मेच्या पहिल्या तारखेला व्हायला पाहिजे. मात्र, या तारखेत शिक्षक वेतनापासून वंचित आहेत. मार्च व एप्रिल महिन्याचे वेतनासाठी आणखी २० दिवसांचा कालावधी लागू शकतो.या प्रकाराला शिक्षणाधिकारी जबाबदार असल्याचा शिक्षक संघाचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्धही कार्यवाही करून त्यांचेही वेतन थांबवावे, अशी मागणी करण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)
अशी आहे वेतन जमा होण्याची प्रक्रिया
वेतनपत्रक मुख्याध्यापकाकडून गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे जाते. मात्र, मागील वेतनाचा व्हॉवचर नंबर शिक्षण विभागाने अद्याप मुख्याध्यापकांना दिला नाही. त्यामुळे वेतनपत्रक तयार झाले नाही. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षणाधिकारी व त्यांच्याकडून वित्त लेखाधिकारी यांच्याकडे पाठविले जाते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतर कोषागार कार्यालयात व नंतर मुख्य बँकेत वेतन राशी वळती केली जाते. तिथून संबंधित पंचायत समितीला वित्त प्रेषण पाठवितात व त्यानंतर संवर्ग विकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व शिक्षकांच्या बँक खात्यावर वेतन जमा होते. मात्र, शिक्षण विभागाची ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
वेतनाअभावी कामे झाली प्रभावित
सध्या लग्न कार्यक्रम असल्याने अनेक शिक्षकांना आप्तस्वकियांच्या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होता आले नाही. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया आर्थिक अडचणीमुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे. बँक व पतसंस्थाकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकित झाल्याने व्याजाचा भुर्दंड बसत आहे. सोबतच दैनंदिन व्यवहारावर याचा परिणाम पडला आहे. तर काही शिक्षकांकडे शेती असल्याने सोसायटीकडून घेतलेले कर्ज मार्च महिन्याच्या शेवटी भरू न शकल्याची नामुष्की ओढवली आहे.