Zilla Parishad presidency for general category | जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण संवर्गासाठी
जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण संवर्गासाठी

ठळक मुद्देइच्छुकांची मोर्चेबांधणी : जिल्ह्यातील अनेकांच्या आशा पल्लवित

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अवघ्या सात महिन्यांवर निवडणूक असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सोडत काढण्यात आली असून भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण संवर्गासाठी जाहीर झाले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांचा आशा पल्लवीत झाल्या आहेत. तब्बल ११ वर्षानंतर अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गाला मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आणि अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.
भंडारा जिल्हा परिषदेत ५२ सदस्य असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. सध्या अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. अध्यक्षपदी काँग्रेसचे रमेश डोंगरे विराजमान आहेत. अवघ्या सात महिन्यानंतर म्हणजे जून महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. मंगळवारी मुंबई येथे अध्यक्षपदाची सोडत जाहीर करण्यात आली. त्यात भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाल्याने अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला तशी ही सुरुवात झाली होती. परंतु आता खुल्या संवर्गासाठी अध्यक्षपद असल्याने स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. अनेकजण अध्यक्षपदासाठी इच्छुक असून जिल्हा परिषद लढविण्याची तयारी चालविली आहे.
सध्या भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस २०, राष्ट्रवादी १५, भाजप १२, शिवसेना १ आणि अपक्ष ४ असे संख्याबळ आहे. अध्यक्षपद काँग्रेसकडे असून उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन सभापती पद आहेत. सात महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना मोर्चेबांधणी करीत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि अपक्षाने बाजी मारली.
विधानसभा निवडणुकीत जिल्हा भाजपमुक्त झाला आहे. अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चारही पक्ष मोठ्या ताकतीने उतरणार आहे. राज्याच्या सत्ता समीकरणात काँग्रेस आणि राष्टÑवादी एकत्र असून शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली आहे. त्याचा परिणामही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसणार आहे.

११ वर्षानंतर खुला संवर्ग
भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तब्बल ११ वर्षानंतर खुल्या संवर्गासाठी जाहीर झाले आहे. २००३ ते २००८ या काळात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते. त्यानंतर २००८ ते २०१० पर्यंत अनुसूचित जाती, २०१० ते २०१३ नागरिकांचा मागासप्रवर्ग (ओबीसी) २०१३ ते २०१५ सर्वसाधारण महिला, २०१५ ते २०१८ नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला आणि २०१८ ते २०२० पर्यंत अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. आता तब्बल अकरा वर्षानंतर खुल्या संवर्गासाठी अध्यक्षपद जाहिर झाल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Web Title: Zilla Parishad presidency for general category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.