कडाक्याच्या थंडीने घेतला तरूणाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 16:26 IST2020-12-26T16:26:23+5:302020-12-26T16:26:33+5:30
Bhandara news: अमोल आपल्या घराच्या स्लॅबवर चढून मोबाईलवर बोलत होता. सकाळी घरची मंडळी अमोलला शोधत असताना तो घराच्या स्लॅबवर मृतावस्थेत आढळून आला.

कडाक्याच्या थंडीने घेतला तरूणाचा बळी
लाखांदूर (भंडारा) : घराच्या स्लॅबवर चढून रात्री मोबाईलवर बोलत असताना कडाक्याच्या थंडीने एका तरूणाचा बळी घेतल्याची घटना लाखांदूर येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली. स्लॅबवर रात्रभर पडून राहिल्याने त्याचा थंडीने मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्याचे तापमान सध्या १० अंशापर्यंत खाली घसरले आहे.
अमोल राजू रहेले (२८) रा. लाखांदूर असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री १० वाजता त्याच्या घरातील सर्व मंडळी झोपी गेली होती. त्यानंतर अमोल आपल्या घराच्या स्लॅबवर चढून मोबाईलवर बोलत होता. सकाळी घरची मंडळी अमोलला शोधत असताना तो घराच्या स्लॅबवर मृतावस्थेत आढळून आला. मोबाईलवर बोलताना तो रात्री अचानक कोसळला आणि रात्रभर थंडीतच कुडकुडत उघड्यावर राहिल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त हाेत आहे. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.