वरठी (भंडारा) : राज्यात मुलींवर अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच एका तरुणीच्या धाडसामुळे तिने स्वतःवरील अतिप्रसंगाचा प्रयत्न हाणून पाडला. तरुणीने ऐनवेळी धाडस दाखविले असले तरी या घटनेचा तिच्या मनावर गंभीर परिणाम झाला. ही घटना दि. ११ मार्चला घडली असून, दि. १३ मार्चला वरठी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. आता 'त्या' तरुणाच्या शोधार्थ पोलिसांची तारांबळ उडाली आहे.
माहितीनुसार, महाविद्यालयातून सुटी झाल्यावर तरुणी नेहमीप्रमाणे घरच्या दिशेने जात होती. त्यावेळी तोंडावर रुमाल बांधून एक तरुण तिचा पाठलाग करीत असल्याचे लक्षात आले. तिने आपला वेग वाढविला. मात्र निर्जन ठिकाणी बळजबरीने अडवत तरुणीचे तोंड दाबले. तरुणीला खाली पाडून दोन्ही पाय ओढून त्याच परिसरात असलेल्या एका पुलाखाली नेत होता.
याचवेळी तरुणीने तरुणाच्या तोंडावर लाथ मारली. लाथ मारताच त्या इसमाचा रुमाल सुटला व तोंड उघडे पडले. यावेळी तिने आरडाओरड करून मदत मागितली, परंतु निर्जनस्थळ असल्याने तिथे कुणीच नव्हते. तरुणीच्या ओरडण्याने तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला. रस्त्यावर अचानक घडलेल्या या प्रकरणाने तरुणी पूर्णतः धास्तावली.
तरुणाचा स्केच केला तयार
धास्तावलेल्या तरुणीने घरच्यांना प्रसंगाची माहिती दिली. यावेळी तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते.
प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पालकांनी तत्काळ पोलिस स्टेशन गाठले.
पोलिसांनी तरुणीचे जबाब नोंदवून तिला दवाखान्यात दाखल केले.
'त्या' तरुणाचा स्केच तयार करण्यात आला असून, पोलिस शोध घेत आहे. तपास पोलिस निरीक्षक नीलेश गिरी करीत आहेत.
शाळा, महाविद्यालय मजनूंच्या रडारवर
शाळा व महाविद्यालय मजनूंच्या रडारवर असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे. पोलिसांचा वचक कमी पडत असल्याचेही चित्र आहे. शालेय वेळेवर गेट बाहेर व रस्त्यावर घिरट्या घालण्याचे प्रकार वाढले आहेत. बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर यांचा हैदोस वाढला आहे.