येरे येरे पावसा, तुला देतो पैसा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:46+5:302021-07-08T04:23:46+5:30
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरासह किटाडी येथील शेतशिवारात रब्बी हंगामात धान, तूर, लाख, लाखोरी, चना, कोथिंबीर यासह गव्हाचे उत्पादन मोठ्या ...

येरे येरे पावसा, तुला देतो पैसा!
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरासह किटाडी येथील शेतशिवारात रब्बी हंगामात धान, तूर, लाख, लाखोरी, चना, कोथिंबीर यासह गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परिसरात सिंचनाच्या सोयी नसल्याने कोरडवाहू शेतजमिनी असल्याने दमदार पावसाच्या सरी बरसल्यानंतरच खरीप हंगामात शेतकरी शेतीच्या कामांना सुरुवात करतात. पेरणीची कामे उरकली असून, पऱ्ह्यांची वाढही झालेली आहे. हवामान खाते दरवर्षीच पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविते. मात्र अंदाज चुकीचा ठरताना दिसतोय. यावर्षी तर शंभर टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. त्याप्रमाणे पाऊसच पडला नाही; मात्र याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. वाढीला आलेले पऱ्हे उन्हामुळे पिवळे पडून मरणासन्न होताहेत.
पावसाने दडी मारल्याने वातावरणातील गारवा नष्ट झाला आहे. कडक उन्हामुळे उकाडा वाढला असून, घामाच्या धारा वाहत आहेत. जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. सुरुवातीला पाऊस पडल्याने जोमाने कामाला लागलेला शेतकरी मात्र उसंत घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रोजच आकाशात ढगांची दाटी असते, मात्र पाऊस पडत नाही. ओढे, नाले, तलाव अद्याप कोरडेच आहेत.
बॉक्स
सायंकाळी ढगांची गर्दी, पण पावसाचा पत्ता नाही
हवामान खाते दररोजच्या अभ्यासाअंती पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करते. परंतु सायंकाळच्या सुमारास आकाशात ढग जमा होतात, वादळवारा येतो आणि ढग निघून जातात. शेतकरी आकाशाकडे पावसाच्या अपेक्षेने बघतच राहतो. पाऊस मात्र पडतच नाही. अशी केविलवाणी प्रतीक्षा पूर्व विदर्भातील शेतकरी गत दहा दिवसांपासून अनुभवतो आहे. १० जुलैपासून मान्सूनच्या प्रगतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.