चुकीचे रिडिंग, ग्राहकात संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:54 IST2019-04-16T22:53:43+5:302019-04-16T22:54:02+5:30
साकोली तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे मीटर रिडींगमध्ये अनियमितता सर्वत्र दिसून येत आहे. याचा मानसिक त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

चुकीचे रिडिंग, ग्राहकात संताप
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : साकोली तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे मीटर रिडींगमध्ये अनियमितता सर्वत्र दिसून येत आहे. याचा मानसिक त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
साकोली येथील एक ग्राहक ज्याचा मिटर नंबर १२३५६३ आहे त्यांना ८ एप्रिल २०१९ ला वीज बिल देण्यात आले. त्यामध्ये चुकीचे रिडिंग दाखविण्यात आले. सबंधित ग्राहकांनी याची तक्रार केली असता टेस्टींग विभागाने याची दखल घेत ५७ युनिट जास्त दाखविण्यात आल्याचे उघडकीस आले. ग्राहकाला या कार्यालयातून त्या कार्यालयात नाहक चकरा माराव्या लागल्या. याचा मनस्ताप ग्राहकाला सहन करावा लागला. शेवटी उपकार्यकारी अभियंता यांनी बिलामध्ये दुरूस्ती करून दिली. चुकीचे रिडींग घेण्याचा प्रकार तालुक्यात सर्वत्र दिसून येतो. मिटर रिडिंगचे कार्य खाजगी एजेंसी कडून करण्यात येते. वीज वितरण कंपनीचे दुर्लक्षित धोरण कारणीभूत आहे.
नवीन मीटरची प्रतीक्षा
अनेक ग्राहकांना मीटरमधील तांत्रिक बिघाडामुळे नवीन मीटर बसविण्यास सांगितले असून वारंवार पाठपुरावा करूनही नवीन मीटर बसविण्यास वीज वितरण कार्यालयाकडून टाळाटाळ केली जात आहे. याचाच भुर्दंड ग्राहकांना बसत आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक ग्राहकांना नेहमीच जास्तीचे बिल येत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. अनेक ग्राहकांना वीज वितरण कार्यालयाचे कर्मचारी नवीन मीटर बसविण्यासाठी उपलब्ध नसल्याचे कारण सांगतात. तब्बल चार महिन्यानंतर नवीन मिटर मिळाल्याचे ग्राहक सांगतात. यावर प्रशासनाने त्वरीत दखल घेवून वाढीव बिलासंदर्भात ग्राहकांना न्याय देणे गरजेचे आहे.
यामध्ये वीज वितरण कंपनी व ग्राहकांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो. यावर त्वरित उपाय योजना व कारवाई करण्यात येईल.
-आर.एम. नंदनवार, उपकार्यकारी अभियंता, साकोली.