Corona Virus in Bhandara; मजुरांचा अन्न पाण्याशिवाय शेकडो किलोमीटर प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 04:32 PM2020-03-28T16:32:23+5:302020-03-28T16:32:44+5:30

जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नाही, गाठीला पैसा नाही, सोबत खाण्यापिण्याचीही सोय नाही, अशा स्थितीत शेकडो मजूर मजल दरमजल करीत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करतात. काही मजूर सायकलने गाव गाठत आहे.

Workers travel hundreds of kilometers without food | Corona Virus in Bhandara; मजुरांचा अन्न पाण्याशिवाय शेकडो किलोमीटर प्रवास

Corona Virus in Bhandara; मजुरांचा अन्न पाण्याशिवाय शेकडो किलोमीटर प्रवास

Next
ठळक मुद्देनागपुरातून निघाले मजल दरमजल करीत मजुरांचे जत्थे

ज्ञानेश्वर मुंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वितभर पोटासाठी चिल्या पिल्यांसह महानगरात राबराब राबणाऱ्या मजुरांवर कोरोनाने महासंकट आणले आहे. हाताला काम नसल्याने मजूर आपल्या मूळ गावाकडे धाव घेत आहे. परंतु जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नाही, गाठीला पैसा नाही, सोबत खाण्यापिण्याचीही सोय नाही, अशा स्थितीत शेकडो मजूर मजल दरमजल करीत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करतात. काही मजूर सायकलने गाव गाठत आहे. गत दोन दिवसांपासून भंडारामार्गे गेलेल्या या मजुरांच्या मदतीसाठी काही सहृदय मंडळी धावून आली.
गावात काम नसल्याने शेकडो मजूर महानगराकडे धाव घेतात. आपल्या कुटुंबासह त्याच ठिकाणी राहून मिळेल ते काम करतात. हजारो मजूर महानगरात राबताना दिसतात. मात्र संकटाच्या काळात या मजुरांसाठी मात्र कुणी धावून येत नाही. याचा प्रत्येक आता कोरोना संसर्गाच्या निमित्ताने येवू पाहत आहे. मध्यप्रदेशातील हजारो मजूर विविध कामाच्या निमित्ताने नागपूरात राहतात. आता कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने त्यांनी गावाकडे जाण्याचा निश्चय केला. परंतु गावाला जाण्यासाठी ना रेल्वे ना एसटी बस. खासगी वाहनधारकांचीही विनवनी केली त्यांनीही नकार दिला. शेवटी येथे उपाशी मरण्यापेक्षा आपल्या जन्मभूमीत जावून राहण्याचा निर्णय घेतला. आपले बिºहाड उचलून ही मंडळी नागपूरहून मजल दरमजल करीत राष्ट्रीय महामागार्ने गावाकडे कूच करीत आहे. गुरूवारी असाच एक ३० ते ३५ मजुरांचा जत्था भंडारामार्गे मध्यप्रदेशकडे रवाना झाला. काही मजुरांनी नागपुरातून सायकली मिळवून त्याने प्रवास सुरू केला आहे. शेकडो किलोमीटर प्रवास करीत ही मंडळी गाव गाठत आहे. भंडारा शहरात सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या नास्त्याची व्यवस्था केली. तुमसर पोलिसांच्या मदतीने त्यांना भोजन देण्यात आले. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भंडारात दाखल झालेल्या काही मजूरांना येथील एका वसतीगृहात मुक्कामी ठेवून त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
या मजुरांसोबत त्यांची मुले, बायका आहे. डोक्यावर प्रत्येकाच्या संसाराचे ओझे आहे. ते घेवून ही मंडळी पाय दुखेस्तोवर चालत आहे. कधी एकदा गावात पोहोचतो, अशी त्यांची अवस्था आहे. प्रचंड हाल सोसत ही मंडळी कोरोनाच्या भीतीने गावाकडे निघाली आहे.

विद्यार्थ्यांचेही हाल
नागपूरसह महानगरात अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने आहे. वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने ही मंडळी तेथेच अडकून पडली आहे. मेस बंद, घराबाहेर काढण्यासाठी घरमालकाचा तगादा, अशा समस्या झेलत आहेत. त्यातील काही विद्यार्थी तर चक्क पदयात्रा करत आपल्या गावाकडे निघाल्याचे दिसत आहे. नागपूरवरून गोंदिया जिल्ह्यातील काही विद्यार्थी शनिवारी सकाळी भंडारा शहरातून मार्गक्रमण करीत होते. रस्ते माहीत नसल्याने रस्त्यावर भेटणाऱ्यांना माहिती विचारत होते. अशा विद्यार्थ्यांचीही भोजनाची व्यवस्था काही दानशूर मंडळींनी करून त्यांना मार्गस्थ केले.

Web Title: Workers travel hundreds of kilometers without food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.