नक्षलग्रस्त भागात कर्मचाऱ्यांची वाणवा
By Admin | Updated: August 21, 2014 23:38 IST2014-08-21T23:38:40+5:302014-08-21T23:38:40+5:30
नक्षलग्रस्त भागातील जनतेला प्राधान्याने सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र साकोली तालुक्यात दिसून येत आहे.

नक्षलग्रस्त भागात कर्मचाऱ्यांची वाणवा
साकोली : नक्षलग्रस्त भागातील जनतेला प्राधान्याने सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र साकोली तालुक्यात दिसून येत आहे. येथील तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागाची दैनावस्था पाहिल्यानंतर या प्रकारावर शिक्कामोर्तब होते.
अन्न व पुरवठा विभागाचा कारभार केवळ दोन अधिकाऱ्यांच्या भरवशावर चालत आहे. त्यामुळे येथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
तहसील कार्यालयात जनतेच्या सोयीसाठी व जनतेला दरमहा राशन दुकानातून अन्नधान्य नियमाप्रमाणे मिळावे यासाठी स्वतंत्र अन्नपुरवठा विभाग आहे. या अन्न पुरवठा विभागांतर्गत एकुण ८५ गावाचा समावेश आहे. त्याकरिता या विभागाकरिता शासनातर्फे एकूण दहा कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली आहेत.
यात निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक, दोन अव्वल कारकुन, तीन कनिष्ठ लिपीक, एक हमाल कम स्वीपर, एक चौकीदार यांचा समावेश आहे असे असून सुद्धा मागील तीन वर्षापासून या विभागात फक्त एक निरीक्षण अधिकारी व एक पुरवठा अधिकारी असो दोन अधिकारी आहेत व दोनच अधिकारी या संपूर्ण पुरवठा विभागाचा काम पाहतात.
या विभागात फाईल नेण्यासाठी एकही शिपाई नाही त्यामुळे शिपायाचे कामही पुरवठा निरीक्षक यांना करावे लागते. ही या विभागाची शोकांतिका आहे. साकोली तालुक्यात आज घडीला २४ हजार ५९ एवढे संख्या असून राशन दुकानाची संख्या १०४ एवढी आहे.
राशन कार्ड व संबंधित अडचणी उद्भल्यास नागरिक या विभागात येतात. मात्र कर्मचाऱ्यांअभावी नागरिकांना लहानशा कामासाठी पाच ते सातवेळा चकरा माराव्या लागतात. जिल्हाधिकारी यांनी या समस्येकडे लक्ष देऊन कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)