विस्मृतीत गेलेला स्वाभिमान जागविण्याचे संघाचे कार्य
By Admin | Updated: October 27, 2015 00:44 IST2015-10-27T00:44:22+5:302015-10-27T00:44:22+5:30
बळ, साहस, शस्त्र असे सर्वकाही असताना आम्ही गुलामगिरीत होतो. कुणीतरी येऊन जातो.

विस्मृतीत गेलेला स्वाभिमान जागविण्याचे संघाचे कार्य
शस्त्रपूजन उत्सव : जितेंद्रनाथ महाराज यांचे प्रतिपादन
भंडारा : बळ, साहस, शस्त्र असे सर्वकाही असताना आम्ही गुलामगिरीत होतो. कुणीतरी येऊन जातो. पंथ, धर्माच्या आधारे फुट पाडून गुलामासारखे वागवितो. आम्ही आमचा इतिहास विसरलो. हेच या मागचे मुळ कारण आहे. शस्त्र, बळ आणि साहस असतानाही आम्ही वर्षानुवर्ष गुलामगिरीत काढले. उपहास सहन करीत राहिलो. विस्मरणात गेलेला बलीदानाचा इतिहास, स्वाभिमान जागविण्याचा मंत्र संघाने दिला. संघाची विचारधारा ईश्वरनिर्मित असून याच विचारधारेवर देशाची अवस्था अवलंबून आहे. जे इतिहासात चुकले ते भविष्यात चुकू देऊ नका. असा सल्ला अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज यांनी दिला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भंडारा नगराचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव रविवारला सहकारनगर मैदानावर झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उद्योगपती रामविलास सारडा, जिल्हा संघचालक राम चाचेरे, नगर संघचालक अनिल मेहर उपस्थित होते. तत्पूर्वी अतिथींच्या हस्ते शस्त्रपूजन झाल्यानंतर स्वयंसेवकांनी प्रात्यक्षिके सादर केले. यावेळी सारडा म्हणाले, त्यागात मोठी शक्ती असते. संघ आणि स्वयंसेवक त्यागातून धर्म रक्षणासाठी सदैव अग्रेसर आहेत. त्यामुळे हे कार्य ईश्वरीय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जितेंद्रनाथ महाराज म्हणाले, संघ एक शक्ती आहे. स्वातंत्रपूर्व काळापासून संघाचे कार्य सुरु आहे. त्यामुळे संघाची नाळ राजकारणाशी कुणी जोडण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते चुकीचे ठरेल. देव, देश आणि धर्मासाठी संघशक्ती झगडत आहे. कार्य करीत आहे. ‘हास’ दोन प्रकारचे असतात. ज्याच्या भरवशावर स्वाभीमान राखला जातो तो इतिहास अन् स्वाभीमान गमावला जातो तो उपहास. आम्ही वर्षानुवर्षे उपहासात जगलो. वेद, उपनिषद संतांची वचने गुरुगोविंद सिंहाचा पराक्रम आम्ही विसरलो. स्वाभीमानाचा मृत्यू झाला, अन् वैभवशाली परंपरेवर आघात झाले. पाठीशी असलेला इतिहास सांगण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून डॉ.हेडगेवार यांनी केले. संघाचा इतिहास वाचल्याशिवाय कुणीही संघाबद्दल वक्तव्य करीत असेल तर तो भारत मातेशी केलेला अप्रामाणिकपणा असेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी श्रीपाद थोटे यांनी सुभाषित, रोशन भुरे यांनी अमृतवचन तर तिलक निंबेकर यांनी वैयक्तिक गीत गायले. परिचय शेखर पांडे यांनी करून दिला. (जिल्हा प्रतिनिधी)