दोन कर्मचाऱ्यांवर १८ गावांचा कारभार
By Admin | Updated: July 23, 2015 00:35 IST2015-07-23T00:35:10+5:302015-07-23T00:35:10+5:30
जनावरांना दर्जेदार लसीकरण व औषधोपचारासाठी चर्चेत असलेल्या सिहोरा येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात ...

दोन कर्मचाऱ्यांवर १८ गावांचा कारभार
जनावरांचा 'काऊनडाऊन' सुरू : रिक्त पदामुळे कर्मचाऱ्यांची कसरत
चुल्हाड (सिहोरा) : जनावरांना दर्जेदार लसीकरण व औषधोपचारासाठी चर्चेत असलेल्या सिहोरा येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात रिक्त पदामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांची पावसाळ्यात जनावरांना सेवा देताना कसरत होणार आहे. या दवाखान्यात दोन कर्मचाऱ्यांवर १८ गावातील पाऊणे चार हजार जनावरांचा भार पडणार आहे.
सिहोरा येथील श्रेणी-१ च्या पशु वैद्यकीय दवाखान्यात कर्मचाऱ्यांची रिक्त पदे पावसाळापुर्वी कार्यरत कर्मचाऱ्यांची टेंशन वाढविणारी आहेत. या दवाखान्यात पशु चिकित्सक अधिकाऱ्याची नियुक्ती आणि त्यांची जनावरांना देण्यात येणारी सेवा जमेची बाजू आहे. या दवाखान्यात पट्टीबंधक व परिचराची जागा रिक्त आहे. एक प्रभारी परिचर असला तरी ३० जुलैला सेवानिवृत्त होत आहे. यामुळे १८ गावांची धुरा आता २ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर येणार आहे. या दवाखाना अंतर्गत गाय ४,३४०, म्हैस २,६४९, कोंबड्या २,५७०, शेळ्या ३,५२१ असे एकूण ३,०७० जनावरांची संख्या आहे. यात सिहोरा, मुरली, मांगली, सिंदपुरी, बोरगाव, सोनेगाव, धनेगाव, रूपेरा, मच्छेरा, सिलेगाव, वाहनी, पिपरी चुन्ही, वांगी, मांडवी, परसवाडा, रनेरा गावांचा समावेश आहे. सिहोऱ्यात बैल बाजार असल्याने अनेक शेतकरी व पशुपालक हे जनावरांना लसीकरण व औषधोपचारासाठी याच दवाखान्याचा उपयोग करित आहे. या दवाखान्यात कार्यरत कर्मचारी दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करित असल्याने या संदर्भात तक्रार नाही, परंतु आता रिक्त पदामुळे सेवा प्रभावित होणार आहे. संलग्नीत गावांचे अंतर्गत लांब पल्ल्यांचे असल्याने या गावात ये-जा करताना कसतर होणार आहे.दरम्यान अनेक गावांची लसीकरणाची प्रभारी जबाबदारी येथील कार्यरत पशु चिकित्सक यांना देण्यात येत आहे. गेल्या वर्षात चांदपुर, मोहाडी खापा गावात अनेक जनावरांना आजाराने ग्रासले होते. यामुळे ही जबाबदारी याच डॉक्टरांना देण्यात आली होती. अशावेळी दवाखाना कुलूप बंदची पाळी येत आहे. गावात पावसाळ्यात जनावरांना घटसर्प आजार होत आहेत. रिक्त पदामुळे जनावरांचे लसीकरण प्रभावित ठरत आहे. या दवाखान्यात रिक्त पदांचा अनुशेष भरण्याची ओरड आहे. (वार्ताहर)
पशु दवाखान्यात बहुतांश सुविधा उपलब्ध आहे. प्रशस्त इमारतीचा उपयोग मार्गी लावणार आहे. दवाखान्यातील रिक्त पदे मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सिहोराकरांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. ही पदे भरून काढण्यासाठी आपला प्रयत्न राहील.
- धनेंद्र तुरकर,
सदस्य जि.प. सिहोरा.
'त्या' इमारतीचे काय?
जिल्हा परिषद अंतर्गत येथील शासकीय जागेत प्रशस्त इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. गेल्या १० वर्षापासून इमारत कुलूप बंद आहे. पशु संवर्धन विभागाची इमारत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अद्यापही या इमारतीचा उपयोग करण्यात येत नाही.