महिला बचत गटांना विक्रीसाठी मिळाली हक्काची बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:38 AM2021-03-09T04:38:04+5:302021-03-09T04:38:04+5:30

भंडारा : नगरपरिषदेंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीसाठी ...

Women's self-help groups get the right market for sale | महिला बचत गटांना विक्रीसाठी मिळाली हक्काची बाजारपेठ

महिला बचत गटांना विक्रीसाठी मिळाली हक्काची बाजारपेठ

Next

भंडारा : नगरपरिषदेंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीसाठी आधार शहर उपजीविका केंद्राची निर्मिती करण्यात आली. आता बचत गटातील महिलांसाठी आधार ठरत आहे. येथे नागरिकांना विविध अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येतात. महिलांसाठी निर्माण करण्यात आलेले आधार शहर उपजीविका केंद्र आता ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

बचत गट केवळ महिलांचे संघटनांचे माध्यम राहिले नसून आता ते महिलांना आर्थिक सक्षमीकरणाचे, तसेच यशस्वी उद्योजिका होण्याचे एक माध्यम झाले आहे. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांमध्ये असलेले सुप्त गुण हस्तकलेच्या माध्यमातून पुढे येत आहेत. आर्थिक विकासासोबतच महिलांचा विकास बचत गटाच्या माध्यमातून होताना दिसतो. भंडारा शहरातील बचत गटातील महिला विविध वस्तूंची निर्मिती करीत आहेत. शहर अभियान प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पडोळे यांनी खासदार तथा नगराध्यक्ष सुनील मेंढे, मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या मदतीने मिस्कीन टँक परिसरात हक्काची बाजारपेठ उभी करून दिली आहे. यात अनेक महिलांनी विविध वस्तूंची निर्मिती करून विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यामुळे आता निर्माण केलेल्या वस्तूंना आधार शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून बाजारपेठ निर्माण झाली आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून शहरात ७०३ महिला बचत गट स्थापन असून, त्यामध्ये ७७७२ महिला सभासद आहेत. २६ वस्तीस्तर संघ तयार करण्यात आले आहेत. यशस्वी अंमलबजावणीसाठी समुदाय संघटक उषा लांजेवार, रेखा आगलावे, समिता भंडारी, माधुरी रोडे, संगीता बांते, रंजना गौरी, रंजना साखरकर, भारती लिमजे, नंदा कावळे, सरिता जांगडे, भावना शेंडे, विनिता सक्करवार, कुंदा बोरकर, पौर्णिमा बारापात्रे, कविता श्रीपात्रे, सुरेखा शेंडे, सुनंदा कुंभलकर, भावना बोरकर, अनिता भेदे, सूर्यकांता वाडिभस्मे, दक्षता लांजेवार, प्रभा वानखेडे, साजिया हुसेन, विशाखा मेंढे, समिन बानो, नम्रता थापा, सुनीता ढवळे, नम्रता मोहबे, हेमलता मोटघरे, शारदा गिर्हेपुंजे, रिता भोंडे, गुरुदास शेंडे, गुलसन ठवकर यांचे सहकार्य मिळत आहे.

बॉक्स

१५ शहरांमध्ये भंडारा शहराची निवड

“मास्क शिलाई व कोविड -१९ बाबत जनजागृती करण्याकरिता महाराष्ट्रातून १५ शहरांची निवड करण्यात आली. त्यामध्ये भंडारा शहराचा समावेश आहे. २१० बचत गटाच्या माध्यमातून ३८ हजार मास्क बनविण्याचे काम शासनाने दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व युनिसेफ यांनी दिले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर बचत गटाकडून स्थानिक महिलांना प्रशिक्षण देऊन ३८ हजार मास्कचे शिवणकाम सुरू झाले आहे. ४ लक्ष ९० हजार रुपयांचे उत्पन्न बचत गटांना मिळणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून मास्क शिलाई व विक्री व कोविड -१९ बाबत जनजागृती करण्यात येत आहे.

बॉक्स

४८१ महिलांना दिला रोजगार

शहरातील ७०३ महिला बचत गटांतील ४८१ महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे, तर १ हजार ३१ महिलांनी प्रशिक्षण घेतले आहे. शहरातील बचत गटातील मासिक बचत १२ लक्ष ८ हजार असून, वार्षिक बचत ही १ कोटी ५३ लक्ष ६ हजार एवढी आहे. शासनातर्फे सदर बचत गटांना खेळते भांडवल १ कोटी ६ लक्ष २३ हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर महिला बचत गटांना विविध व्यवसायाकरिता व अंतर्गत कर्जव्यवहार ७ कोटी ५३ लक्ष ५४ हजार एवढा निधी विविध राष्ट्रीयीकृत बँकांतून वितरित करण्यात आला आहे. कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत शासनमान्य प्रशिक्षण संस्थेअंतर्गत ब्युटिशियन, शिवणकाम व कर्तन, नर्सिंग, लॅब असिस्टन्स, कम्प्युटर टॅली, असिस्टन्स ब्युटी थेरपिस्ट, असिस्टन्स इलेक्ट्रिशियन, ब्युटी थेरपी अँड हेअर स्टायलिंग लेव्हल ०१, डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर व विविध तांत्रिक प्रशिक्षण घेतले आहे.

कोट

महिला बचत गट तयार करून गटाचे संघटन, उद्योग प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख कौशल्य, प्रशिक्षण स्वयंरोजगाराकरिता अल्प व्याजदरात अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले आहे. मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांची निर्मिती झाली. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना आधार शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण झाले आहे.

प्रवीण पडोळे,

प्रकल्प व्यवस्थापक, नगर परिषद, भंडारा.

कोट

बचत गटांच्या माध्यमातून शहरात महिलांचे मोठे संघटन निर्माण झाले आहे. महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आधार शहर उपजीविका केंद्र हे चांगले व्यासपीठ आहे. नागरिकांनीही याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

विनोद जाधव,

मुख्याधिकारी, नगर परिषद, भंडारा

Web Title: Women's self-help groups get the right market for sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.