महिलांनी गाजविली ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:25 IST2017-11-26T00:25:25+5:302017-11-26T00:25:38+5:30
गावाचा विकास करणे आणि गावातील समस्या सोडविण्यासाठी ग्रामसभांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

महिलांनी गाजविली ग्रामसभा
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : गावाचा विकास करणे आणि गावातील समस्या सोडविण्यासाठी ग्रामसभांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने गावातील महिलांनी ठाणा ग्रामसभेत प्रथमच मोठ्या संख्येने हजेरी लावून न्याय हक्काच्या मागण्या मंजूर करण्यासाठी प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर ठराव संमत करीत ग्रामसभा गाजविली. शेवटपर्यंत प्रश्न विचारत एकाही पुरूषांना बोलण्याची वेळ येऊ दिली नाही हे विशेष.
एरव्ही ग्रामसभा म्हटले की, पहिली सभा कोरमअभावी तहकुब होते. पुढील तहकुब सभेत आपल्याच विचाराच्या दोनचार जणांना घेऊन तहकुब सभेत विविध कामांना मंजूर घेत असतात. ठाणा पेट्रोलपंप येथे यावेळी वेगळेच पाहावयास मिळाले. येथील महिला राजसत्ता आंदोलन समितीने चंग बांधून ग्रामसभेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले. त्यानुसार महिला सभागृहात उपस्थित झाले.
प्रथम महिलांची सभा झाली. तिथे महिलांनी समस्या मांडल्या. त्यानंतर गावातील इतर नागरिक ग्रामसभेला उपस्थित झाले. सभागृह अपुरे पडल्याने ग्रामपंचायत आवारात सभा घेण्यात आली. यातही महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नवनिर्वाचित सरपंच सुषमा पवार या सभाध्यक्ष होत्या. विषयसुचीनुसार सभेला सुरुवात झाली.
ग्रामपंचायतचे सन २०१८-१९ चे वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यात आले. शासकीय परिपत्रकाचे वाचन केले. यात जनसेवकाची निवड करण्यात आली. यातही महिलांनी बाजी मारली. येथे फरजाना शेख यांची निवड केली. ठाणा येथे कब्रस्तानकरीता जागा देण्याची मागणी संत नरहरी महाराज परिसराचे सौंदर्यीकरण करणे, नवीन आनंद बुद्ध विहार परिसराचा विकास करणे व दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. १.७० कोटी रूपयांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाची चौकशी करून योजना सुरू करा.
सरपंचांनी घोषणापत्रात नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायततर्फे ५ रूपयांचे भोजन सुरू करण्यासंबंधी प्रश्नाचे उत्तर मागितले. सभाध्यक्ष व सचिवांना विकासात्मक बाबीवर धारेवर धरले. ठराव संमत करून घोषणा करण्यासाठी बाध्य केले. गावाच्या विकासासाठी महिला ग्रामसभेत सातत्याने आल्यास गावाचा चौफेर विकास होईल, असे महिला राजसत्ता आंदोलन समितीने म्हटले आहे.