गावातील महिलांना प्रगतीचा मार्ग गवसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:32 IST2021-03-08T04:32:47+5:302021-03-08T04:32:47+5:30

राजू बांते मोहाडी : एकजूट, जिद्द, मेहनत याद्वारे या महिलांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्या आता ...

The women of the village found a way to progress | गावातील महिलांना प्रगतीचा मार्ग गवसला

गावातील महिलांना प्रगतीचा मार्ग गवसला

राजू बांते

मोहाडी : एकजूट, जिद्द, मेहनत याद्वारे या महिलांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्या आता ख-या अर्थाने सक्षम झाल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. मेहनतीच्या जोरावर प्रगतीचा मार्ग गवसला आहे.

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला महिलांचा सहभाग सर्वच क्षेत्रांत दिसू लागला आहे. मर्यादित क्षेत्रापुरते स्वत:ला मर्यादित न ठेवता महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिला बचत गटासारख्या चळवळीच्या माध्यमातून समाजात सन्मानाने जगण्याचा मार्गदेखील महिलांनी स्वीकारलेला पाहायला मिळत आहे.

मोहाडी तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानांतर्गत १,७११ महिला बचत गट कार्यरत आहेत. यात १८ हजार ५२२ महिला स्वत:च्या पायावर उभ्या आहेत.

महिला बचत गटाच्या माध्यमामधून अनेक महिलांचे संसार उभे राहिले आहेत. त्या महिला आपल्या संसारासाठी हातभार लावत आहेत. २०२०-२०२१ मध्ये सात लक्ष ३१ हजार रक्कम ५७९ महिला बचतसमूहाला कर्जवाटप करण्यात आली आहे. तसेच ९४८ महिला बचत गटसमूहाला १०-१५ हजार खेळते भांडवल प्राप्त करून देण्यात आले आहे. या खेळत्या भांडवलावर आंधळगाव येथे वारली पेंटिंग, करडी येथे बांबू व्यवसाय, वरठी कागदी बाहुल्या, पाचगाव येथे जैविक खत, जैविक गांडूळ, कांद्री येथे बॅग व्यवसाय तसेच दुग्ध व्यवसाय, अगरबत्ती, पापड, मसाले आदी व्यवसाय मोहाडी तालुक्यात महिला बचत गटांमार्फत केले जात आहेत.

अनेक महिलांनी आपले व्यवसाय घरबसल्या सुरू केले आहेत. या सर्व महिलांचे व्यवसाय आता स्थिर झाले आहेत. आंधळगाव येथे तर रेशीम कापडाच्या साड्या करण्याचा व्यवसाय दुर्गा व यशस्वी बचत गटांकडून केला जातो. या बचत गटाने तयार केलेल्या साड्यांना राज्यात व परराज्यांत मागणी आहे. कुरिअरद्वारे आंधळगाव येथील साड्या विविध ठिकाणी पाठविल्या जातात. राज्यात होणाऱ्या महिला बचत गटांच्या प्रदर्शनांत आंधळगाव येथील साड्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात.

बचत गटांमुळेच या महिला एकत्र येऊन सुसंवाद साधू लागल्या. परस्परांमध्ये विचारविनिमय करू लागल्या आहेत. त्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर सुधारला, याची जाणीव त्यांना आहे. आज या महिलांची स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू झाली आहे. हेच या महिला बचत गटांच्या चळवळीचे यश आहे.

कोट

बचत गटांमुळे आर्थिक कणा सक्षम झाला आहे. प्रगतीच्या दिशेने झेपावणारा आत्मविश्वास वाढलेला आहे.

याकरिता गरज आहे, ती जिद्द व संघर्ष करण्याची, संधीचं सोनं करण्याची.

कांचन निंबार्ते, उपसरपंच, ग्रामपंचायत कान्हळगाव

Web Title: The women of the village found a way to progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.