आरोग्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा
By Admin | Updated: February 10, 2016 00:44 IST2016-02-10T00:44:09+5:302016-02-10T00:44:09+5:30
स्वच्छता व आरोग्याचा महिलांशी घनिष्ठ संबंध आहे. शेणामातीने सारवून घराची स्वच्छता ठेवता येते.

आरोग्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा
रोहयोच्या कामावर महिलांना मार्गदर्शन : सरोज वासनिक यांचे प्रतिपादन
भंडारा : स्वच्छता व आरोग्याचा महिलांशी घनिष्ठ संबंध आहे. शेणामातीने सारवून घराची स्वच्छता ठेवता येते. कुटुंबाचे आरोग्य सुदृढ ठेवता येते पण त्याच घरातील नागरिक शौचालयासाठी उघड्यावर जात असतील तर नागरिकांच्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित राहू शकत नाही. कुटुंबातील, लेकराबाळांंच्या सुरक्षिततेसाठी शौचालयाच्या बांधकामाकरिता महिलांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन संनियंत्रण व मुल्यमापण तज्ज्ञ सरोज वासनिक यांनी केले.
पंचायत समिती तुमसर अंतर्गत ग्रामपंचायत पिटेसूर पिपरीया येथील रोजगार हमी योजनेच्या कामावर घेतलेल्या महिलांच्या सभेला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी सभेला सरपंच कल्पना रामटेके, ग्रामपंचायत सदस्य हिरा लांजेवार, राधिका तांडेकर, अंकुश राऊत, सुरेंद्र भोंडे, राजेश रामटेके, सचिव माटे, विस्तार अधिकारी घटारे, जिल्हा कक्षाचे माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राजेश्वर येरणे, गट समन्वयक पल्लवी तिडके, अनिता कुकडे, अनिता कुकडे, हर्षाली ढोके, शशिकांत घोडीचोर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व पाणी गुणवत्ता संनियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तुमसर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतमध्ये खंड विकास अधिकारी केशव गड्डापोळ, सहायक खंड विकास अधिकारी, हिरूडकर यांचे नेतृत्वात सन २०१५-१६ व इतर ग्राम पंचायतीच्या आराखड्यातील ग्रामपंचायतीमध्ये हळदी-कुंकू व महिला सभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद व गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता पंचायत समिती तुमसर यांचे वतीने स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक कुटुंबांनी वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी महिला सभेला तज्ज्ञ, सल्लागार, गट समन्वयक, समूह समन्वयक मार्गदर्शक करीत आहेत.
वासनिक म्हणाल्या, गरिबातील गरीब कुटुंबात एखाद्या विवाहाचा कार्यक्रम घेण्यासाठी नियोजन करून तो कार्यक्रम यशस्विरीत्या पार पाडल्या जातो. त्याचप्रमाणे शौचालयाच्या बांधकामासाठी पैशाची जुळवाजुळव करून शौचालय बांधकामाचे नियोजन व्हायला हवे.
एखाद्या कुटुंबात नवरा बायकोमध्ये शौचालय बांधण्यावरून मतभेद असतील तर दोघांनीही कुटुंबांच्या हितासाठी समन्वय साधून बांधकाम करायला हवे, शौचालयाचा जास्तीत जास्त त्रास हा महिलांना होतो, त्यामुळे शौचालयाच्या बांधकामासाठी महिलांनीच पुढाकार घेऊन गाव हागणदारीमुक्त करावा, असे सांगितले.
त्यानंतर विस्तार अधिकारी बी. घटारे यांनी, शौचालय हा प्रत्येक कुटुंबाकरिता आवश्यक आहे, त्या दृष्टीने प्रत्येक कुटुंबाचे विचार करायला हवा. आपल्या कुटुंबातील प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या कुटुंबासाठी शौचालय बांधायलाच हवा. आपल्या घराला सुरक्षित ठेवण्यासाठी शौचालयाचे बांधकाम करून बक्षीस रूपाने मिळणारे १२ हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले.
समुदाय स्वच्छता कार्ड संकल्पनेंतर्गत शौचालयाच्या उपलब्धतेनुसार लयभारी, खतरा धोका, जरा जपून, फिप्टी फिप्टी रंगाचे स्टीकर सरपंच कल्पना रामटेके, सरोज वासनिक, सचिव माटे यांचे हस्ते लावून त्या त्या कुटुंबांना शौचालयाचे महत्त्व सांगण्यात आले.
४०० च्या जवळपास उपस्थित असलेल्या महिला पुरूषांनी यावेळी शौचालय बांधकामाचा निर्धार व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी)