दारूबंदीसाठी साकोली तालुक्यात महिला सरसावल्या
By Admin | Updated: July 12, 2014 23:31 IST2014-07-12T23:31:16+5:302014-07-12T23:31:16+5:30
शासनाने अवैध धंदे व दारूविक्रीवर आळा बसविण्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची निर्मिती केली असली तरी या दोन्ही विभागाच्या आशिर्वादानेच अवैध दारूविक्री सुरू असल्याचे चित्र तालुक्यात आहे.

दारूबंदीसाठी साकोली तालुक्यात महिला सरसावल्या
साकोली : शासनाने अवैध धंदे व दारूविक्रीवर आळा बसविण्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची निर्मिती केली असली तरी या दोन्ही विभागाच्या आशिर्वादानेच अवैध दारूविक्री सुरू असल्याचे चित्र तालुक्यात आहे.
दारूविक्रीला आळा घालण्यासाठी अनेक गावातील महिला पुढाकार घेवून दारूबंदी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. यावरून महिलाच जर दारूबंदी करीत असतील तर पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाची गरज ती काय, असा सुर महिलाकडून ऐकू येत आहे.
साकोली तालुक्यातील बऱ्याच गावात दारूबंदी ही महिलांच्या पुढाकाराने झाली. या दारूबंदीसाठी अनेक गावातून आवाज उठविला जातो. मात्र त्याचा काहीच उपयोग होत नाही.
साकोली तालुक्यात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या दारूविक्रीवर आळा बसावा व लोकांची व्यसनापासून सुटका व्हावी यासाठी अनेक संघटनांनी आवाज उठविला. मात्र पोलिसांची साठगाठ आणि पैशाची ताकत यावर अवैध धंदे चांगलेच फोफावले.
सध्या बीअरबारमध्येही ग्राहकांची लुट होताना दिसते. ग्राहकांना दिली जाणारी दारूचे बिल देण्यात येत नाही, एमआरपी पेक्षा अधिकचे पैसे वसूल करणे, अधिकाऱ्यांशी संगनमत करून नकली दारू विकणे असेही प्रकार सध्या साकोली तालुक्यात सुरू आहेत. याकडे पोलीस व राज्य उत्पादनशुल्क विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
वाईन शॉपमध्ये नियमप्रमाणे चिल्लर दारूविक्री करता येत नाही. मात्र साकोली येथे पैशाच्या हप्तेबाजीमुळे येथील वाईनशाप मध्ये दारूची चिल्लर विक्री राजरोसपणे सुरू होते.
याकडेही पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देण्याची गरज आहे तर साकोली येथून दररोज मोटारसायकलने देशी दारू अवैध विक्रेत्याना त्यांच्या घरपोच पाठविली जाते. याचीही चौकशी जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी करावी व तालुक्यातील दारूचा महापूर थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)