लोकमत न्यूज नेटवर्क विरली (बु)): कुटुंब नियोजनांतर्गत केलेल्या सदोष ऑपरेशनमुळे तब्बल दोन महिन्यांनी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करावी आणि पीडित महिलेच्या दोन लहान मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घ्यावी, या मागणीला घेऊन मृत महिलेचा मृतदेह लाखांदूर-पवनी रस्त्यावर ठेवून रविवार दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मेघा आकाश बनारसे (२४) असे मृत महिलेचे नाव आहे.
विरली (बु) तालुक्यातील रहिवासी मेघा बनारसे महिलेने १६ नोव्हेंबर रोजी सरांडी (ता. लाखांदूर) येथे बु, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित शिबिरात कुटुंब नियोजनांतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर एक दिवसही उलटला नाही, तेच पीडितेला शस्त्रक्रिया ठिकाणी वेदना होऊ लागल्या. कुटुंबीयांनी तिला जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. पीडितेवर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबीयांनी पीडितेला १८ जानेवारी रोजी खासगी रुग्णालयातून पुढील उपचारांसाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मेघा बनारसे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीय व ग्रामस्थांनी गाव गाठताच १९ जानेवारी रोजी मृतदेह स्थानिक राज्य महामार्गावर ठेवून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. बनारसे दाम्पत्याला दोन मुले आहेत.
घटनेची माहिती मिळताच लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार, पवनीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम, एसएचओ सचिन पवार, तहसील आरोग्य अधिकारी डॉ. पडोळे, पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे व इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आश्वासन दिले. मात्र, मिळालेल्या आश्वासनाने आंदोलकांचे समाधान झाले नाही. वृत्त लिहिपर्यंत आंदोलन सुरूच होते.
दीड महिन्यापूर्वी केले होते उपोषण शस्त्रक्रिया होऊनही वेदना जाणवू लागल्याने आंतर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबीयांसह काही ग्रामस्थांनी डॉक्टरांवर कारवाई व नुकसान भरपाईच्या मागणीसाठी २ डिसेंबर रोजी सरांडी (बु) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर उपोषण केले होते. यावेळी आरोग्य प्रशासनाने दोषी डॉक्टरांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर, तसेच काही रोख रक्कम व काही रुपयांचा धनादेश पीडितेच्या कुटुंबीयांना दिल्याने उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले.
धनादेश झाला बाऊन्स दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात दाखल पीडितेवर उपचार सुरू होते. पुढील उपचारासाठी पैशांची गरज असताना, पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोग्य प्रशासनाकडून मिळालेला धनादेश बैंक खात्यात जमा केला होता. तो धनादेश बाऊन्स झाल्याने पीडितेच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला.