पवनीतील खड्डेमय रस्ते रहदारीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 05:00 IST2021-08-23T05:00:00+5:302021-08-23T05:00:39+5:30
पावसाळ्यात रस्ते खड्डेमय असले की खड्ड्याच्या अंदाज न समजल्यास अपघाताची शक्यता असते, खड्डेमय रस्त्यामुळे नगरात सायकल-मोटारसायकलचे किरकोळ अपघात देखील झाले आहेत. प्रामुख्याने ताडेश्वर वॉर्ड, बेलघाटा-बस्तरवारी वॉर्ड, गांधी चौक व जवाहर गेट समोरील परिसर याठिकाणी रस्ते अतिशय जास्त खड्डेमय झालेले आहेत.

पवनीतील खड्डेमय रस्ते रहदारीस अडथळा
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : नगर परिषद क्षेत्रात पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईनचे काम करण्यात आले. पाईपलाईन टाकून झाल्यानंतर रस्ते दुरुस्ती अपेक्षित होती, पण कंत्राटदार व नगर परिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नगरातील अपवाद वगळता सर्वच रस्ते रहदारीस अडथळा निर्माण करीत आहेत.
पावसाळ्यात रस्ते खड्डेमय असले की खड्ड्याच्या अंदाज न समजल्यास अपघाताची शक्यता असते, खड्डेमय रस्त्यामुळे नगरात सायकल-मोटारसायकलचे किरकोळ अपघात देखील झाले आहेत. प्रामुख्याने ताडेश्वर वॉर्ड, बेलघाटा-बस्तरवारी वॉर्ड, गांधी चौक व जवाहर गेट समोरील परिसर याठिकाणी रस्ते अतिशय जास्त खड्डेमय झालेले आहेत.
नगरातील बहुतेक रस्ते अरुंद, त्यात रस्त्याचे दुतर्फा दुकानांचे बोर्ड, बँका व दुकानासमोर पार्किंग केलेल्या मोटारसायकलींची गर्दी आणि पाईपलाईन टाकण्यासाठी खोदून नादुरुस्त करण्यात आलेले रस्ते सर्वच त्रासदायक असूनही पालिका प्रशासन, पदाधिकारी व नगरसेवक यांना लोकहिताची जाणीव नाही त्यामुळे पवनीकरांना त्रास सहन करावा लागत आहे.
गरज नसताना लोकवस्तीबाहेर सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधकाम करण्यात आले पण नगरातील रस्ते दुरुस्ती करण्यात येत नाहीत. पालिका प्रशासनाविरुद्ध नगरवासीय रोष व्यक्त करीत आहेत. पण प्रभार असलेले मुख्याधिकारी व पदाधिकारी दखल घेत नसल्याने नगरवासीयांत असंतोष निर्माण झाला आहे. नगर परिषद प्रशासनाने रस्ते दुरुस्तीची मोहीम सुरू करून रहदारीतील अडथळा दूर करावा व अपघात टाळावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.