लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : होळीच्या दुसरा दिवशी सर्वच जण मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या रंगांची उधळण करतात. परंतु, तालुक्यातील गवराळा या गावातील नागरिक मागील ३२ वर्षापासून रंगाचा सण भक्तिरंगात रंगून साजरा करीत असल्याने हे गाव संपूर्ण राज्यात आपले वेगळेपण टिकवून आहे.
गवराळा या गावात किसनबाबा अवसरे महाराज यांचे वास्तव्य होते. ते मुळचे चंद्रपुर जिल्ह्यातील बेलगाव येथील रहिवासी होते. ते व्यवसायाने गवंडी होते. ते गवराळा येथील हनुमान मंदिरात राहत असत. त्यांनी श्रमदानातुन या परिसरातील अनेक गावांमध्ये मंदिराचे बांधकाम केले. त्यांचा मितभाषी, मनमिळाऊ स्वभाव आणि धार्मिक वृत्तीमुळे ते परिसरात सुप्रसिद्ध होते. अशा या श्रमप्रतीष्ठेला चालणा देणाऱ्या कर्मयोगी किसनबाबांचे १९ मार्च १९९२ रोजी निधन झाले. आपल्या जीवनयात्रेच्या अंतिम दिवशिही त्यांनी मंदिराचे अपुर्ण बांधकाम पुर्ण केले.
तो दिवस होळीचा होता. त्यावेळी त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला अन् तेव्हापासुनच गवराळा वासीयांनी होळी साजरी न करण्याचा संकल्प सोडण्यात आला.
पेटते केरकचऱ्याची होळीगावात आजही होळी जाळली जाते. परंतु, लाकडांची होळी पेटत नाही तर ग्रामसफाई करून गोळा केलेल्या केरकचऱ्याची होळी पेटते. धूलिवंदनाच्या दिवशी ग्रामगीता तत्त्वज्ञान, ग्रामसभा, ग्रामस्वराज्य या विषयांवर अनुभवी लोकांचे गावाचा विकास साधण्यासाठी मार्गदर्शन मिळते.