लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील काही शाळांमधून विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार तांदळाची अफरातफर होत असल्याची बातमी गुरुवारी 'लोकमत'ने प्रकाशित केली. कारवाईच्या भीतीपोटी काही शाळांत शिल्लक असलेल्या तांदुळाची लपवालपती करण्यात आली. कामासाठी संबंधित शाळांमधील या मुख्याध्यापकांची चांगलीच तारांबळ उडली. या वृत्ताने शिक्षण विभागातील अधिकारी खडबडून जागे झाले.
शहरातील विद्यार्थी शालेय पोषण आहार खात नाही. त्यामुळे शालेय पोषण आहाराचा तांदूळ शिल्लक राहतो. मात्र, साठा रजिस्टरला शिल्लक तांदळाची नोंद केली जात नाही आणि परस्पर धान्य पुरवठाधारक, तसेच स्वस्त रेशन दुकानदाराला विकला जाऊन उरलेला तांदूळ संबंधित शाळांमधील मुख्याध्यापक आणि धान्य पुरवठाधारकाच्या घशात जात असल्याची पालक आणि नागरिकांची ओरड आहे.
याबाबत 'लोकमत'ने 'शालेय पोषण आहाराचे खरे लाभार्थी कोण?' या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली. आणि शाळांचे धाबे दणाणले. तांदूळ चोरीचे बिंग फुटू नये, यासाठी शहरातील काही शाळांनी गुरुवारी सकाळीच बिन रेकॉर्ड उरलेले तांदळाचे कट्टे, तेलाचे पाकीट, वाचलेल्या डाळी, तिखट, मीठाचे पाकीट सकाळीच गायब केल्याचे शाळा परिसरातील नागरिकांनी सांगितले. या प्रकरणामुळे संताप व्यक्त होत आहे.
अधिकाऱ्यांकरवी शाळेला भेटी
पंचायत समिती स्तरावरील अधिकाऱ्यांनी काही शाळांना भेटी दिल्या. धान्यसाठा आणि पोषण आहाराची वरवर माहिती घेतली. यातील काही शाळांनी शिल्लक तांदळाची सकाळीच विल्हेवाट लावली तर काही मलाईदार शाळांच्या धान्य साठ्याची थातूरमातूर पाहणी केली.