कुठं आहे गा कोरोना म्हणणारेही आता धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST2021-04-08T04:35:21+5:302021-04-08T04:35:21+5:30
मोहाडी तालुक्यात वृक्ष संगोपन, मालगुजारी तलावातील गाळ काढणे, पाटबंधारे नहर दुरुस्ती, मजगी, गुरांचे शेड, पांदण रस्ते, घरकुल आदी १६६ ...

कुठं आहे गा कोरोना म्हणणारेही आता धास्तावले
मोहाडी तालुक्यात वृक्ष संगोपन, मालगुजारी तलावातील गाळ काढणे, पाटबंधारे नहर दुरुस्ती, मजगी, गुरांचे शेड, पांदण रस्ते, घरकुल आदी १६६ कामे सुरू आहेत. त्यात १ हजार ९४० मजूर उपस्थित आहेत. त्यातील पांदण रस्ते ४ सुरू असून, त्यावर १ हजार ११३ मजुरांची ६ एप्रिलपर्यंत उपस्थिती होती. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कमीच होता. सध्या मात्र परिस्थिती जिल्ह्यात विदारक बनली आहे. ग्रामीण भागात कोरोना विषाणूने शिरकाव केला. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी कोविड-१९ च्या विषाणूची तपासणीसाठी शिबिर लावले गेले. पण, स्वतःहून अँटिजेन तपासणी करायला पुढे येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
मोहाडी तालुक्यातील आंधळगाव, बेटाळा, जांब, करडी, वरठी या प्राथमिक केंद्रात तसेच डोंगरगाव, कान्हळगाव, धुसाळा, हरदोली, धोप, कांद्री, हिवरा, उसर्रा, मुंढरी, पालोरा, जांभोरा, देव्हाडा, नीलज, नेरी, सातोना, मांडेसर या प्राथमिक उपकेंद्रात २५ दिवसात ६ एप्रिलपर्यंत १५ हजार ७ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. यावरून लसीकरण करण्यास जनता किती अनुत्सुक आहे हे स्पष्ट होते. आशा वर्कर्स यासाठी गावात फिरून लोकांना अँटिजेन तपासणी व कोविड-१९ प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रेरित करीत असतात. तथापि, अँटिजेन तपासणी व कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्यात उदासीन दिसून येत आहेत. त्याचा परिणाम संपूर्ण गावातील जनतेला सहन करावा लागत आहे.
मजुरांची चाचणी करा
रोजगार हमी योजनेच्या कामावर येणाऱ्या मजुरांची कोविड-१९ चाचणी करावी. मजुरांनी चाचणी झालेले प्रमाणपत्र सोबत आणावे तसेच कामावर सामाजिक अंतर राखणे, मास्क घालणे, हात धुण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कोविड-१९ प्रतिबंधक लस घेण्याबाबत लेखी सूचना रोजगार हमी संबंधित अधिकाऱ्यांना तहसीलदार देवीदास बोंबर्डे यांनी दिल्या आहेत.