डाव्या कालव्यात पाणी केव्हा सोडणार?
By Admin | Updated: November 10, 2014 22:39 IST2014-11-10T22:39:32+5:302014-11-10T22:39:32+5:30
शेतकऱ्यांचे धानासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना डावा कालवा, गोसे खुर्द प्रकल्प विभागाचे अभियंता याकडे दुर्लक्ष करीत डाव्या कालव्यात पाणी सोडणे बंद केले. त्यामुळे १३० दिवसाचे

डाव्या कालव्यात पाणी केव्हा सोडणार?
कोंढा (कोसरा) : शेतकऱ्यांचे धानासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना डावा कालवा, गोसे खुर्द प्रकल्प विभागाचे अभियंता याकडे दुर्लक्ष करीत डाव्या कालव्यात पाणी सोडणे बंद केले. त्यामुळे १३० दिवसाचे धान वाचविण्यासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत करीत आहेत. पाण्याअभावी भारी धान धोक्यात असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
गोसे खुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात यावर्षी प्रथमच डावा कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने कोंढा कोसरा, सोमनाळा, भावड, सेंद्री, आकोट, चिचाळ, खैरी अशा अनेक गावच्या शेतकऱ्यांनी इंजिनद्वारे शेतीला पाणी दिले. त्यामुळे चौरास भागात कोरडवाहू जमिनीला पाणी मिळाल्याने शेकडो हेक्टर जमिनीत धान पिक घेता आले. कोरडवाहू शेतीला पाणी न मिळाल्याने अनेक शेतकरी दुष्काळाच्या छायेत आहेत. हलक्या प्रतीचे धान निघाले, पण अजून १३०, १३५ दिवसाचे जयश्रीराम, केसर, क्रांती धान निघण्यास वेळ आहे. अशावेळी या धान पिकाला पाण्याची गरज असताना धरण विभाग, डावा कालवा, वाही यांनी डाव्या कालव्यात पाणी सोडणे बंद केले आहे. त्यामुळे शेतकरी भारी धानपीक जगविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करीत आहेत. कालव्याच्या खड्ड्यात साचलेले पाणी इंजीनद्वारे देताना दिसत आहे. तीन महिन्यापासून कोंढा परिसरात जोरदार पाऊस न पडल्याने मोठा दुष्काळ पडला आहे.
डाव्या कालव्यामुळे कालव्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना धानपिकास संजीवनी मिळाली. अशावेळी एकवेळा पुन्हा भारी धानासाठी डाव्या कालव्यात सोमनाळा गेटपर्यंत पाणी सोडणे आवश्यक आहे. या संबंधात वाही येथील अभियंताची शेतकऱ्यांनी भेट घेऊ न एकदा पाणी सोडण्याची विनंती केली तेव्हा पाणी सोडण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
पूर्व विदर्भात वरदान ठरणारा गोसे प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. डावा कालव्यात बाराही महिणे पाणी सोडणे आवश्यक आहे. पण कालव्याच्या साईडचे फ्लोरिंगचे काम रखडले असल्याने बाराही महिने पाणी सोडणे अशक्य आहे. तरी रखडले काम त्वरीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या एकदा डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)