गरजूंना हक्काचे घर केव्हा मिळणार?
By Admin | Updated: February 11, 2016 00:49 IST2016-02-11T00:49:27+5:302016-02-11T00:49:27+5:30
नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात शेकडो बेघर कुटुंब वास्तव्यास आहेत. काहींनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून स्वत:च्या कुटुंबासाठी निवारा उपलब्ध करून दिलेला आहे.

गरजूंना हक्काचे घर केव्हा मिळणार?
पवनी येथील प्रकार : नगरपालिका क्षेत्रातील तक्रार
अशोक पारधी पवनी
नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात शेकडो बेघर कुटुंब वास्तव्यास आहेत. काहींनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून स्वत:च्या कुटुंबासाठी निवारा उपलब्ध करून दिलेला आहे. शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत ७६ लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आलेले होते.
त्यापैकी चार लाभार्थ्यांनी मालकीच्या जागेवर घरकूल बांधले आहे. उर्वरीत ७२ घरकुलांचे काम पालिका प्रशासनाने ठेकेदारी पद्धतीने संयुक्त घरकुल पद्धती वापरून करण्याचे ठरविले. परंतु दोन वर्ष लोटूनही घरकुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना हक्काचे घर केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत भाईतलाव वॉर्डातील एका इमारतीत १२, रामपूरी वॉर्डात १२, वैजेश्वर वॉर्डात क्र. १ च्या इमारतीमध्ये १२ क्रमांक २ इमारतीमध्ये १२ असे एकूण ४ इमारतीमध्ये ४८ घरकुल बांधण्यात आले आहे. त्यापैकी ४२ घरकुलाचे काम पूर्ण तर ६ घरकुलाचे काम अपूर्ण आहे. लाभार्थ्यांनी भरावयाची रक्कम भरल्यानंतर घरकुल दिले जात आहे. परंतु इमारतीचे काम पूर्ण करावयास लागणारा कालावधी खूप जास्त असल्याने लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. वैजेश्वर वॉर्डातील क्रमांक दोनच्या इमारतीचे काम प्रलंबित असल्याने लाभार्थी हिस्सा भरूनही त्यांना घरकुल उपलब्ध होऊ शकलेला नाही.