शिक्षकांच्या पात्रतेची पडताळणी कधी?
By Admin | Updated: April 18, 2016 00:36 IST2016-04-18T00:36:58+5:302016-04-18T00:36:58+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या काही शाळांनी बारावी व पदवीधारकांच्या हाती शैक्षणिक भवितव्य सोपविले आहे.

शिक्षकांच्या पात्रतेची पडताळणी कधी?
ग्रामीण भागातील वास्तव : बारावी, पदवीधर बनले शिक्षक
भंडारा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या काही शाळांनी बारावी व पदवीधारकांच्या हाती शैक्षणिक भवितव्य सोपविले आहे. कायम विनाअनुदानित शाळांमध्ये हा प्रकार सर्रास सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य खराब होऊ नये, यासाठी या खासगी शाळांमध्ये शिक्षकांच्या पात्रता तपासणीची गरज आहे.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांत मुलांना प्रवेश देण्यासाठी ग्रामीण भागात पालकांची धडपड असते. नेमके हे हेरून इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले आहे. पालकांचा कल कॅश करण्यासाठी शिक्षण संस्थांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. काही नामांकित शाळा वगळता उर्वरित शाळांमध्ये सर्रास बारावी ते पदवीधर युवक व युवतींना अल्पशा मानधनावर मुलांचे अध्ययनाचे काम सोपवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य खराब करण्याचा प्रकार सुरू आहे. शासन निर्देशानुसार शिक्षणशास्त्र पदविका अर्थात डीटीएड किंवा बीएडधारक उमेदवारच शिक्षक म्हणून सेवा देऊ शकतो. मात्र नियम धाब्यावर बसवून वशिलेबाजीने अनेक अपात्र उमेदवारांना शिक्षक म्हणून नेमण्यात आले आहेत.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य खराब होत असल्याने या सर्व शाळांमधील शिक्षकांच्या पात्रतेची पडताळणी शिक्षण विभागाने करावी, अशी मागणी पालकांची आहे. (शहर प्रतिनिधी)
पालक अनभिज्ञ
इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची शैक्षणिक पात्रता काय आहे? याबाबत पालक शक्यतोवर विचारणा करीत नाही. खासगी कॉन्व्हेंट किंवा प्राथमिक शाळा व्यवस्थापनाच्या विश्वासावर पालक आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करतात. मात्र पालकांच्या विश्वासाला छेद देत काही खासगी शाळांनी अपात्र उमेदवारांच्या हाती मुलांचे शैक्षणिक भविष्य सोपविले आहे.
हजारोंचे शुल्क घशात
या शाळांना शिक्षण विभागाची मान्यता असली तरी अनुदान मात्रनाही. त्यामुळे या सर्व संस्थांद्वारा शैक्षणिक व परीक्षा शुल्कापोटी दरवर्र्षी प्रवेश प्रकियेच्या वेळी १0 हजारांवर शुल्क उकळतात. याव्यतिरिक्त दोन प्रकारचे गणवेश त्या संस्थेचे शिक्षण साहित्य आदी प्रकारात पालकांकडून रक्कम उकळण्यात येते.