पॅसेंजर गाडी सुरू होण्याचा मुहूर्त केव्हा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 05:00 IST2021-12-22T05:00:00+5:302021-12-22T05:00:54+5:30
रेल्वे प्रशासन या बाबीची दखल घेणार की नाही, असा सवाल प्रवासी विचारत आहे. एक पॅसेंजर गाडी सुरू केली असली तरी त्यामध्ये चांगलीच गर्दी असते. कोरोनाचे संकट टळले नाही. तर दुसरीकडे एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट प्रवाशांना काढावे लागत असल्याने आर्थिक लूट सुरू आहे. इतर गाड्या सुरू करण्यात आल्या, मग पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्यासाठी नेमकी अडचण काय, असा सवाल केला जात आहे.

पॅसेंजर गाडी सुरू होण्याचा मुहूर्त केव्हा ?
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून बंद केलेल्या काही पॅसेंजर आणि लोकल गाड्या अद्यापही सुरू करण्यात आल्या नाही तर इतवारी-दुर्ग ही लोकल गाडीसुद्धा अद्यापही बंदच आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकिटाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या गाड्या केव्हा सुरू करणार म्हणून प्रवासी वांरवार विचारणा करीत आहे. रेल्वे प्रशासन या बाबीची दखल घेणार की नाही, असा सवाल प्रवासी विचारत आहे. एक पॅसेंजर गाडी सुरू केली असली तरी त्यामध्ये चांगलीच गर्दी असते. कोरोनाचे संकट टळले नाही. तर दुसरीकडे एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट प्रवाशांना काढावे लागत असल्याने आर्थिक लूट सुरू आहे. इतर गाड्या सुरू करण्यात आल्या, मग पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्यासाठी नेमकी अडचण काय, असा सवाल केला जात आहे.
केवळ याच पॅसेंजर सुरू
- भंडारा रोड (वरठी) रेल्वे स्थानकावर फक्त एक पॅसेंजर गाडी सुरू आहे. नागपूर ते रायपूर असे या पॅसेंजर गाडीचे नाव आहे. अन्य पॅसेंजर बंद असल्याने प्रवाशांना नाहक पैसे अधिक मोजून एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करावा लागत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे
सुरू असलेल्या एक्स्प्रेस गाड्या
- हावडा-मुंबई मेल
- अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस
- समता एक्सप्रेस
- आझादहिंद एक्सप्रेस
- गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस
- अजमेर-पुरी एक्सप्रेस
- हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस
प्रवाशांच्या खिशाला झळ....
रेल्वे विभागाने इतर एक्स्प्रेस गाड्यांची संख्या वाढविली आहे. मग केवळ लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय काय? एक्स्प्रेस गाड्यांच्या नावाखाली सुरू केलेली लूट त्वरित थांबवावी. - संतोष दुधबरई, प्रवासी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून रेल्वेने पॅसेंजर, लोकल गाड्या बंद केल्या त्या अद्यापही सुरू केलेल्या नाही. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
- अंशुल मारबते, प्रवासी
जनरल तिकीट बंदच
- एक्स्प्रेस गाड्यांना अद्यापही जनरलचे डब्बे जोडण्यात आले नाही. त्यामुळे जनरल तिकिटांची विक्री बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
- काही लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी या गाड्यांमध्ये एक्स्प्रेसचे तिकीट आकारले जात आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.