धावत्या एसटीचे चाक निघाले
By Admin | Updated: July 1, 2017 00:22 IST2017-07-01T00:22:34+5:302017-07-01T00:22:34+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथून भंडाराकडे जाणाऱ्या एका धावत्या बसचे चाक अचानक निखळले.

धावत्या एसटीचे चाक निघाले
प्रवासी सुखरूप : लाखांदूर-पवनी मार्गावरील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथून भंडाराकडे जाणाऱ्या एका धावत्या बसचे चाक अचानक निखळले. चालकाच्या प्रसंगावधावनामुळे दुर्घटना टळली. ही घटना गुरूवारी सायंकाळी लाखांदूर-पवनी मार्गावर घडली.
भंडारा आगाराची एमएच १२ - ६९४१ क्रमांकाची बस वडसा येथून लाखांदूर मार्गे पवनीकडे प्रवासी घेवून जात होती. बस धावत असतानाच अचानक बसच्या मागील डाव्या बाजूच्या चाकाचे सर्व नटबोल्ट तुटल्याने चाक निघाले. हे चाक दुर अंतरावर जावून थांबले. चालकाच्या समयसूचकतेमुळे अनर्थ टळला. अन्यथा ही बस उलटली असती किंवा समोरच्या झाडाला जावून धडकली असती. या बसमध्ये ६० प्रवासी होते.
महामंडळाच्या अनेक कालबाह्य बसेस मागील अनेक वर्षांपासून रस्त्यावर धावत आहेत. अशा बस मधून प्रवास करताना ग्राहकांचा जीव धोक्यात आला आहे. महामंडळाने कालबाह्य बसेस बदलवून नवीन बसेस किंवा बसची दुरूस्ती केलेली वाहनेच महामार्गावर फिरवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.