परिश्रम व नियोजनातून मिळाला उत्पन्नाचा मार्ग
By Admin | Updated: July 1, 2014 01:19 IST2014-07-01T01:19:50+5:302014-07-01T01:19:50+5:30
मनात जिद्द व परिश्रम करण्याची तयारी असली तर प्रतिकुल परिस्थितीवर मात करून समोर जाता येते. वडीलोपार्जीत अडीच एकर शेती असणाऱ्या एका शेतकऱ्याने परिश्रम व नियोजनाचा मार्ग स्वीकारून

परिश्रम व नियोजनातून मिळाला उत्पन्नाचा मार्ग
भंडारा : मनात जिद्द व परिश्रम करण्याची तयारी असली तर प्रतिकुल परिस्थितीवर मात करून समोर जाता येते. वडीलोपार्जीत अडीच एकर शेती असणाऱ्या एका शेतकऱ्याने परिश्रम व नियोजनाचा मार्ग स्वीकारून केळीची व अन्य फळझाडांची बाग फुलवून आर्थिक संपन्नता व उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे.
लाखनी तालुक्यातील सोमवालवाडा येथील शेतकरी सुरेश तुकाराम टिचकुले यांच्याकडे वडीलोपार्जीत १० एकर शेती होती. आजोबाला चार मुले असल्यामुळे वडीलांच्या हिश्याला अडीच एकर शेती, त्यातही अर्धी पडीत. शिक्षण जेमतेम १० वी पर्यंत झाले. आईवडीलांसह पडीत जमिनीत माती खोदून बांध्या तयार केल्या. कसेतरी खाण्यापुरते धान पिकायला लागले. परिस्थिती नाजूक त्यामुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. अडीच एकर जमीन चार ठिकाणी अर्धा अर्धा एकराचे तुकडे, परंतु एकाच मार्गावर चारही तुकड्यांना नाला लागून आहे. एका तुकड्यावर आजोबांनी विहिर तयार केली होती व मोरीने पाणी काढून भाजीपाला पिकवायचे. गावात श्रीमंत शेतकऱ्यांनी विहिरी खोदून विहिरींवर विद्युत पंप बसवून भाजीपाला लावणे सुरु केले. सुरेश टिचकुले यांना ते शक्य नव्हते. आईवडीलांसोबत नाल्यामध्ये पाच फुट खड्डा तयार केला. जुने विद्युत पंप कसेतरी खरेदी केले. वीज कनेक्शन घेऊन दहा गुंठ्यात भाजीपाला लावणे सुरु केले. त्यामुळे थोडीफार आर्थिक मदत व्हायला लागली. नंतर शासनाच्या जवाहर योजनेतून विहिर मिळाली. उत्पन्न हळूहळू वाढू लागले. शेताशेजारी पडीत जागा खरीदी करून पाच एकराचा प्लॉट तयार झाला. त्यात धान, गहू, उन्हाळी मुंग असे तीन पिके तसेच काही जागेत भटई, वांगे, मिरची, टमाटर, चवळी, गवार, भेंडी, मेथी, कोथींबिर अशी सर्वच प्रकारची वाण घेण्यास सुरुवात केली. शेतीला सेंद्रीय खत मिळावे म्हणून चार पाच म्हशी खरेदी केल्या. दुधातून उत्पन्न मिळायला लागले. तेथे गांडूळ खत निर्मिती केली.
शासनाच्या फळबाग विकास कार्यक्रमातून पन्नास कलमी आंबे लावले. साग, कडुलिंब, बांबू यांचीही लागवड केली. शासकीय अनुदानातून तुषार संच बसविला. ओलीताचे क्षेत्र वाढल्याने त्याने नवनवीन प्रयोग सुरु केले. ऊस लागवड केली. त्यामध्ये एकरी ३० टन उत्पन्न मिळाले. ड्रीप संच बसवून केळीची लागवड केली. शेतीच्या राखणीसाठी हिस्सेदार ठेवला असला तरी शेतीची मशागत, डवरणी, खत टाकणे, औषधी फवारणी ते स्वत: करतात. शेतात २० बाय २० मिटरची शेततळे तयार केली. त्यातून मत्स्य उत्पादनही ते घेतात.