बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:37 IST2018-04-29T22:36:44+5:302018-04-29T22:37:01+5:30
तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने मध्यप्रदेशातील ४० गावे तथा तुमसर तालुक्यातील नदी काठावरील गावात जलसंकट निर्माण झाल्याने रविवारी सकाळी ११ वाजता बावनथडी (राजीवसागर) धरणातून पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने मध्यप्रदेशातील ४० गावे तथा तुमसर तालुक्यातील नदी काठावरील गावात जलसंकट निर्माण झाल्याने रविवारी सकाळी ११ वाजता बावनथडी (राजीवसागर) धरणातून पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सोमवारी पुन्हा पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तुमसरचे आ. चरण वाघमारे, मध्यप्रदेशातील आ. के.डी. देशमुख, बालाघाटचे खासदार बोधसिंग भगत यांच्या प्रयत्नामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याचा संयुक्त प्रकल्प बावनथडी नदीवर राजीवसागर आहे. दोन्ही राज्याला समप्रमाणात पाण्याचा वाटप करण्यात येते. मध्यप्रदेशातील बालाघाट, वाराशिवनीसह परिसरातील ४० ते ५० गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व शेतीकरिता पाण्याची नितांत गरज आहे. तुमसर तालुक्यातील बावनथडी नदी काठावरील गावातही पिण्याचे पाणी व शेतीकरिता धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती.
आ. चरण वाघमारे, मध्यप्रदेशातील आ. के.डी. देशमुख, खा. बोधसिंग भगत यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकारी, तथा राज्य सरकारला पाण्याचा विसर्ग करण्याकरिता साकडे घातले होते. बावनथडी नदी सध्या कोरडी पडली आहे. पाच टीएमसी पाणी रविवारी सोडण्यात आले, परंतु कोरडी नदी असल्याने पाणी नदीत जिरले. मोवाडपर्यंत पाणी जाण्याकरिता पुन्हा पाच टीएमसी पाणी सोमवारी सोडणार असल्याची माहिती मध्यप्रदेशातील धरणाचे तांत्रिक कर्मचारी ठाकरे यांनी लोकमतला दिली. बावनथडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गेडाम, उपविभागीय अधिकारी पाखमोडे यांचेशी संपर्क केल्यावर त्यांनी प्रतिसाद दिला नाही.