लिकेजमुळे पाण्याचा विसर्ग
By Admin | Updated: July 21, 2014 23:40 IST2014-07-21T23:40:43+5:302014-07-21T23:40:43+5:30
बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पाचे दोन वक्रद्वार आणि महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील उजवा कालव्याच्या मुख्य विमोचकाचे गेट घट्ट न बसल्यामुळे पाण्याचा सातत्याने विसर्ग सुरु आहे. या दोन्हीतून २४ तास

लिकेजमुळे पाण्याचा विसर्ग
२४ तास पाण्याचा अपव्यय : बावनथडी प्रकल्पातील प्रकार
मोहन भोयर - तुमसर
बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पाचे दोन वक्रद्वार आणि महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील उजवा कालव्याच्या मुख्य विमोचकाचे गेट घट्ट न बसल्यामुळे पाण्याचा सातत्याने विसर्ग सुरु आहे. या दोन्हीतून २४ तास पाण्यावा विसर्ग सुरू आहे. दोन्ही राज्यांनी तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्याचे काम हाती घेतले आहेत, परंतु त्यात यश आलेले नाही. सन २०१३ मध्ये या प्रकल्पात पाणी साठवण सुरू झाले होते. मागील एक वर्षापासून पाण्याचा २४ तास अपव्यय होत आहे.
बावनथडी (राजीवसागर) हा आंतरराज्यीय प्रकल्प महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याचा संयुक्त प्रकल्प असून त्यासाठी दोन्ही सरकारने पुढाकार घेतला आहे. तुमसर तालुक्यातील सीतेकसा येथे आहे. दोन्ही राज्यांच्या सीमा येथे लागून आहेत. ३५ वर्षापासून या प्रकल्पाची विविध कामे सुरू आहेत.
या प्रकल्पाचे मुख्य वक्रद्वार सहा व गळभरणी गॉर्ज फिलींगची कामे मध्यप्रदेश शासनाकडे होती.
या वक्रद्वारांना लोखंडी गेट बसविण्यात आले. सहापैकी दोन गेट घट्ट बसलेले नाहीत. घट्ट बसल्यानंतर त्यातून विसर्ग होत नाही, परंतु येथे मागील एका वर्षापासून २४ तास दोन वक्रद्वारातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भोपाळ येथील तंत्रज्ञ हा तांत्रिक बिघाड दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापुर्वी येथे विसर्ग बंद करण्याकरीता तंत्रज्ञानाचे पथक येवून गेले होते, परंतु त्यांनाही यश आले नव्हते.
महाराष्ट्राच्या सीमेतील मुख्य उजवा कालव्याचे मुख्य विमोचकाचे गेटही घट्ट न बसल्याने यातूनही मोठ्या प्रमाणात २४ तास पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा पाण्याचा विसर्ग मागील एका वर्षापासून सुरू आहे. हे विशेष येथे सुद्धा राज्य शासन व प्रकल्पाचे अधिकारी गंभीर दिसत नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर मुख्य विमोचकाचे दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
पाण्याची बचत करणे पाण्याचा अपव्यय टाळणे याबाबीकडे प्रकल्प अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष येथे आहे. पाण्याच्या सतत विसर्ग तांत्रिक बिघाडामुळे होत आहे. हा तांत्रिक बिघाड आतापर्यंत कां? दूर करण्यात आला नाही. हा प्रश्न अनुत्तरीत आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता कुणीही अधिकारी बोलायला तयार नाहीत. या दोन्ही तांत्रिक बिघाडामुळे प्रकल्पाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बावनथडी प्रकल्प पाणीसाठी असलेल्या मुख्य धरण व वक्रद्वार गॉर्ज फिलींग केलेले स्थळी बाहेरून पिंचींग केलेले नाही.