पाणी शुद्धीकरण यंत्रणा पडली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:00 IST2019-05-03T00:59:06+5:302019-05-03T01:00:59+5:30
मोहाडी तालुक्यातील लेंडेझरी मोठी येथे दोन बोरवेल्स व एक विहीर कोरडी पडली आहे. गट ग्रामपंचायत केसलवाडा कडून बोरवेल्सला फ्लोराईडयुक्त पाणी शुद्धीकरण यंत्र लावलेला आहे. परंतु बोरवेलला पाणी नसल्याने पूर्ण गावात पिण्याच्या पाण्याचा हरताळ आहे.

पाणी शुद्धीकरण यंत्रणा पडली बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील लेंडेझरी मोठी येथे दोन बोरवेल्स व एक विहीर कोरडी पडली आहे. गट ग्रामपंचायत केसलवाडा कडून बोरवेल्सला फ्लोराईडयुक्त पाणी शुद्धीकरण यंत्र लावलेला आहे. परंतु बोरवेलला पाणी नसल्याने पूर्ण गावात पिण्याच्या पाण्याचा हरताळ आहे. यासंबंधी ग्रामपंचायत केसलवाडाला माहिती दिलेली असूनही आजपर्यंत पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. महिलांना दीड किमी अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.
मोहाडी तालुक्यातील केसलवाडा ग्रामपंचायत गट अंतर्गत असलेला लेंडेझरी मोठी गाव जंगलाच्या शेजारी वसलेला गाव आहे. या गावात पंचवीस कुटुंब वास्तव्याला आहेत. लेंडेझरी गाव ४ किमी अंतरावर असलेल्या केसलवाडा गट ग्रामपंचायतला जुळलेला आहे. या गावातून एकच ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेला आहे.
उर्वरित सदस्य, सरपंच, उपसरपंच हे केसलवाडा येथील असल्याने चार वर्षामध्ये एकाही पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. ५० ते ६० लोकसंख्या असलेल्या गावामध्ये एक विहीर आणि दोन बोरवेल असून बोरवेल व विहिरी आटल्याने गावात पिण्याच्या पाण्याचा हाहाकार आहे.
परिस्थीती गंभीर असूनही एक महिन्यापासून ग्रामसेवक किंवा पदाधिकाऱ्यांनी ढुंकून सुद्धा पाहिले नाही, अशी या गावाची परिस्थिती झालेली आहे.
ग्रामसेवकाचे समस्येकडे दुर्लक्ष
गावात विविध समस्या आवासून असताना ग्रामसेवक लेंडेझरी गावात कधीही फिरकून पाहत नाही. आजपर्यंत ग्रामसेवकाने गावाला साधी भेट दिलेली नाही. ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे लेंडेझरी ग्रामस्थांना विविध कामासाठी आल्यापावली परतावे लागते. ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने प्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत आहे.