भंडारा जिल्ह्यात वैनगंगेचा जलस्तर घटला, पूर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 08:56 PM2020-08-31T20:56:38+5:302020-08-31T20:58:57+5:30

भंडारा जिल्ह्यातील ५८ गावांना महापूराचा फटका बसला असून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

The water level of Waingange in the reservoir decreased, the flood continued | भंडारा जिल्ह्यात वैनगंगेचा जलस्तर घटला, पूर कायम

भंडारा जिल्ह्यात वैनगंगेचा जलस्तर घटला, पूर कायम

Next
ठळक मुद्देपंधरा हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविलेकोट्यवधींचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :  गत दोन दिवसांपासून महापूराचा सामना करणाऱ्या नागरिकांना सोमवारची पहाट दिलासा देऊन उजाडली. सकाळपासून वैनगंगेचा जलस्तर घटण्यास सुरूवात झाली. मात्र पूरस्थिती कायम होती. पूर ओसरलेल्या गावांत उद्ध्वस्त झालेली घरे आणि चिखल असे विदारक चित्र दिसत होते. जिलह्यातील ५८ गावांना महापूराचा फटका बसला असून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाच्यावतीने १४ हजार ८१३ लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बचाव व मदत कार्य सुरूच आहे. महापुरात सुदैवाने कुणाचाही मृत्यू झाला नाही.

मध्यप्रदेशातील संजय सरोवर तसेच गोंदिया जिल्ह्यातील दोन धरणातील पाणी सोडल्याने वैनगंगा नदीसह  सुर व चुलबंद या उपनद्याही दुथडी भरून वाहत आहेत. सातत्याने जलस्तर वाढत गेल्याने शनिवारी रात्रीपासून नदी काठावरील गावांमध्ये पूराचे पाणी शिरले. विशेष म्हणजे प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येत असल्याची पुर्वसूचना वेळेवर मिळाली नसल्याने पूरस्थिती गंभीर झाली. भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखांदूर तालुक्यात ५८ गावांना महापूराचा फटका बसला. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक नागरिकांनी दोन दिवस अहोरात्र बचाव व मदत कार्य करून १४ हजार ८१३ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याले. मात्र अनेक गावांत मदत पोहचलीच नसल्याचे दिसून आले. काही गावांतील नागरिकांनी मंदिर अथवा उंच ठिकाणी आश्रय घेतला होता. अन्न आणि पाण्यावाचून त्यांना दोन दिवस काढावे लागले.
भंडारा शहरातही भीषण परिस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी घरात पाच ते सात फुट शिरल्याने नागरिकांनी घराच्या छताचा आश्रय घेतला. शहरातील ग्रामसेवक कॉलनी, मेंढा परिसर, कपिलनगर, समतानगर, गणेशपूर, भोजापूर परिसर, आनंदनगर, शिक्षक कॉलनी, नागपूर नाका आदी भागात सोमवारीही पूर कायम होता. पूर ओसरायला लागल्याने अनेकांनी तेथून बाहेर पडण्या सुरूवात केली. तर गत दोन दिवसात सुरक्षित बाहेर काढलेल्या नागरिकांना शहरात उभारण्यात आलेल्या शिबिरात ठेवण्यात आले आहे.

आपत्ती निवारण अंतर्गत जिल्हा प्रशासनाने ३० नावा तयार ठेवल्या होत्या. तसेच पट्टीचे पोहणारे १३३ व्यक्ती मदतीला तैनात होते. यात भंडारा तालुका अंतर्गत १४ नावांची व्यवस्था करण्यात आली होती. या कामासाठी ३६ कर्मचारी तैनात करण्यात  होते. जिल्हा प्रशासनाचे जवळपास ८०० कर्मचारी मदतकार्यात गुंतले आहेत. शेती पिकांचे आणि मालमत्तेचे किती नुकसान झाले याची नेमकी माहिती सध्या उपलब्ध नाही. संपूर्ण यंत्रणा बचाव व मदतीच व्यस्त आहे.

संजय सरोवरातून आतापर्यंत २० हजार क्यूसेस पाणी सोडण्यात आल्याची माहिती आहे. मध्यप्रदेशातून वैनगंगेच्या पात्रात पाणी पोहोचायला तब्बल ३९ तास लागतात. पाणी सोडल्यानंतर त्याची पूर्वकल्पना मध्यप्रदेश सरकारने दिली नाही, असे गोसेखुर्द व जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.  

५८ गावे पूर्णत: बाधित
पूर परिस्थिती उदभवल्यानंतर जिल्ह्यातील नदी काठावरील ५८ गावे पूर्णत: बाधित झाली तर उर्वरित काही गावे अंशत: बाधीत झाल्याची माहिती आहे. यात भंडारा तालुक्यातील २३, पवनी २२, तुमसर पाच, मोहाडी सहा तर लाखांदूर तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नदीकाठावरील गावांना सर्वाधिक फटका बसला असून हजारो हेक्टरमधील धान शेती, बागायत शेती व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

राष्ट्रीय महामार्ग ३६ तासांपासून ठप्प
महापूरमुळे मुंबई - कोलकात राष्ट्रीय महामार्ग गत ३६ तासांपासून ठप्प आहे. भंडारा शहरालगत नागपूर नाका परिसरात आणि भिलेवाडी पुलावर चार फूट पाणी आहे. त्यामुळे हा मार्ग बंद असून वाहनांच्या दोन्ही बाजूला रांगा लागल्या आहे. वाहतूक केव्हा सुरळीत होईल हे अद्यापही निश्चित सांगण्यात आले नाही. 

Web Title: The water level of Waingange in the reservoir decreased, the flood continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर