शहरात पाणीटंचाईचे संकट बळावले

By Admin | Updated: May 26, 2017 01:57 IST2017-05-26T01:57:37+5:302017-05-26T01:57:37+5:30

शहरातील ज्वलंत विषय ठरलेल्या पाणीपुरवठाचा प्रश्न नागरिकांसाठी जीवघेणा ठरू पाहत आहे. पिण्याचे पाणी मिळणे

The water crisis in the city has increased | शहरात पाणीटंचाईचे संकट बळावले

शहरात पाणीटंचाईचे संकट बळावले

महिलांची भटकंती : दूषित पाण्याने आजार फोफावले
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील ज्वलंत विषय ठरलेल्या पाणीपुरवठाचा प्रश्न नागरिकांसाठी जीवघेणा ठरू पाहत आहे. पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने महिलांची भटकंती वाढली आहे. दुसरीकडे दुषित पाण्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
शहरात १० हजारांच्यावर खाजगी नळधारक असून ३५० पेक्षा जास्त सार्वजनिक नळ आहेत. वैनगंगा नदीपत्रातून पाण्याचा पुरवठा होत असला तरी जलशुद्धीकरण करूनही मिळणारे पाणी दूषित आहे. दशकभरापासून भेडसावत असलेल्या या समस्येवर अजुनपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही. नगरपालिकेत कुणाचीही सत्ता असो परंतु पाणी प्रश्नावर आजपर्यंत हा प्रश्न गांभीर्याने घेण्यात आला नाही. नवीन प्रस्ताव तयार करून विभागाकडे पाठविण्यात आला असला तरी त्यावर निर्णय झालेला नाही. जुन महिना लागायला पाच दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. मान्सूनचे आगमन काही दिवसांवर येवून ठेपले असतानाही पालिका प्रशासनाने मुलभूत घटक असलेल्या पाण्याच्या मुद्यावर गंभीरतेने निर्णय घेतलेला दिसून येत नाही. नगरपालिकेत किंबहूना राज्यातही भाजपची सरकार आहे परंतु शंभर सव्वाशेकोटी रूपयांची योजना आणायला किंवा निधी उपलब्ध करायला एवढा कालावधी लागत असेल तर सत्ता कुठल्या कामाची असाही प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

कालबाह्य झालेली जलवाहिनी
चार दशकांपुर्वी पाण्याची जलवाहिनी घालण्यात आली होती. परिणामी ही जलवाहीनी कित्येक ठिकाणाहून लिकेज आहे याची नेमकी माहितीही पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध नाही. प्रत्येक ठिकाणी खड्डा खोदून ठेवणेही शक्य नाही. अशा स्थितीत कालबाह्य झालेली जलवाहिनी उखाडून फेकणे हाच एकमेव पर्याय आहे. पाणी पुरवठ्याच्या भविष्यकालीन योजनावर सर्वेक्षणही झाले आहे. प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबी प्रकर्षाने मंजूर करून आगामी काळात त्यावर काम सुरू होणे महत्वाचे आहे.

मेंढा येथे पाण्यासाठी हाहाकार
शहरातील उत्तर-पुर्व दिशेला वसलेल्या व नेहरू वॉर्डात व गौतम बुद्ध वॉर्ड परिसरात मागील दहा दिवसांपासून पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. पाणीपुरवठा ठप्प असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील काही वॉर्डामध्ये नगरसेवकांच्या मदतीने टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मेंढा परिसरात किमान टँकरनेतरी पाणीपुरवठा करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. वॉर्डातील नगरसेवक या गंभीर समस्येकडे लक्ष देतील काय, असा सवाल वॉर्डवासी विचारीत आहे.

Web Title: The water crisis in the city has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.