सावधान, भंडारा शहरात पाण्याची पातळी खालावतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:53 IST2019-08-18T00:53:00+5:302019-08-18T00:53:30+5:30
शहरातील पाण्याची समस्या हा काही नवीन विषय नसला तरी भविष्यकालीन समस्येला आव्हान देणारा ज्वलंत प्रश्न बनला आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून भंडारा शहराचा जलस्तर सातत्याने घटत असून यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सावधान, भंडारा शहरात पाण्याची पातळी खालावतेय
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील पाण्याची समस्या हा काही नवीन विषय नसला तरी भविष्यकालीन समस्येला आव्हान देणारा ज्वलंत प्रश्न बनला आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून भंडारा शहराचा जलस्तर सातत्याने घटत असून यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. ऐकेकाळी भंडारा जिल्ह्यात १५ हजारांपेक्षा जास्त तलाव व बोड्यांची संख्या होती. मात्र आज घडीला भंडारा व गोंदिया जिल्ह्यात तीन हजार ५०० पेक्षा अधिक तलाव व बोडी आहेत. त्यातही अतिक्रमण,निधीचा वानवा व अन्य स्थानिक समस्या भर घालून आहेत. भंडारा शहरातील खामतलाव या तलावाची स्थितीही फारशी चांगली नाही. एकेकाळी पाण्याच्या बाबतीत समृद्ध असलेला खामतलावही समस्येच्या गर्तेत सापडला आहे. या तलावात पाणी साठा असल्याने परिसरातील भागातही जलसाठा विपूल प्रमाणात राहायचा. मात्र कालांतराने तलावाची खोलीकरण व अन्य बाबींमुळे पाणीसाठा कमी झाला आहे. तर दुसरीकडे भूगर्भाची पातळीही खालावल्याने परिसरातील विहिरी विंधन विहिरी व बोअरवेलची पातळीही खाली गेली आहे. त्यामुळे उन्हाळ्यासह ऐन पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी चिंतेत राहावे लागत आहे. ८०-९० फुटांवर पाणी लागत असल्याने नागरिक बोअरवेल कमी खोदायचे. मात्र विद्यमान स्थितीत अडीचशे ते तीनशे फुट बोअर करावी लागत आहे. असाच प्रत्यय भंडारा शहरातील अन्य भागांमध्येही दिसू लागला आहे.
पाण्याची पातळी खालावत असल्याने पाण्याच्या बाबतीत भंडारा शहरातील भविष्य संकटमय दिसत आहे. परिणामी आजपासूनच यावर कायमस्वरुपी तोडगा काढून जलपुनर्भरणावर लक्ष केंद्रीत करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तरच भविष्यकालीन पिढीला त्याचा उपयोग होऊ शकेल. नदीत पाणी व गावात बोंब अशी विचित्र स्थिती होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.