पवनीला पर्यटन विकासाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 22:44 IST2018-11-06T22:43:35+5:302018-11-06T22:44:29+5:30

ऐतिहासिक महत्वाचे असलेले पवनी नगर प्राचीन व मंदिराचे शहर म्हणून ओळखले जात आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपरिषद अविकसीत आहे. विकासाला गती द्यायची असेल तर पवनी व परिसराचा पर्यटनक्षेत्र विकास हाच पर्याय उरलेला आहे. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व आर्थिकदृष्ट्या अविकसीत असलेल्या नगरातील नगर पालिकेला १५० हून अधिक वर्षे झालेली आहेत.

Waiting for Pavnila tourism development | पवनीला पर्यटन विकासाची प्रतीक्षा

पवनीला पर्यटन विकासाची प्रतीक्षा

ठळक मुद्देपालिका झाली १५१ वर्षांची : ऐतिहासिक वारसा लुप्त होण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : ऐतिहासिक महत्वाचे असलेले पवनी नगर प्राचीन व मंदिराचे शहर म्हणून ओळखले जात आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपरिषद अविकसीत आहे. विकासाला गती द्यायची असेल तर पवनी व परिसराचा पर्यटनक्षेत्र विकास हाच पर्याय उरलेला आहे. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व आर्थिकदृष्ट्या अविकसीत असलेल्या नगरातील नगर पालिकेला १५० हून अधिक वर्षे झालेली आहेत.
नगरात १५० पेक्षा अधिक मंदिर अद्यापही सुस्थितीत आहेत. त्यापैकी काही दुर्लक्षित आहेत. वैनगंगा नदी किनाऱ्यावरील वैजेश्वर घाट, दिवाणघाट, ताराबाईचा घाट व पवनखिंड (खिडकी) असे महत्वाचे घाट आहेत. प्राचीन जवाहर गेट व परकोट आहे. ११ गरूड खांब आहेत. पुरातत्व विभागाने उत्खनन करून शोधलेले भव्य असे बौद्ध स्तुपाचे अवशेष आहेत.
नगरात विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असे पंचमुखी सर्वलोभद्र गणेश आहे. सोबतीला महाकाय रांजीचा गणपती व धरणीधर गणेश सुद्धा आहे.
दसरा उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या परिसरात चंडीका माता, नदीकाठावर दुर्गा माता, गावातील मध्यवर्ती ठिकाणी एकविरा माता, कुऱ्हाडा तलावालगत भंगार माता, कोरंभी रोडवरील टेकडीवर कालका व ज्वाला माता, जगन्नाथ मंदिर, दत्त मंदिर, मुरलीधर मंदिर, बालाजी मंदिर, वैजेश्वर मंदिर, निलकंठेश्वर मंदिर, पाताळेश्वर मंदिर, राम मंदिर, धोबी तलाव, मारोती मंदिर, एकटांग्या हनुमान मंदिर, टेंभेस्वामीचे मंदिर, भूतेश्वर मंदिर आणि गधादेव मंदिर सुद्धा आहे.
भगवान शंकराची पिंड असलेले कित्येक मंदिर नगरात वेगवेगळ्या नावाने ओळखले जात आहेत. असे मंदिर अस्तित्वात आहेत. एवढा सगळा वैभव पवनी नगरात असूनही पर्यटनक्षेत्र म्हणून गावाचा विकास होवू शकला नाही.
तालुक्यात गोसेखुर्द इंदिरा सागर धरण, उमरेड पवनी, कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य स्थळ येथील महासभाधिभूमी असे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे स्थळ आहे. नगरात वर्षभर वेगवेगळ्या मंदिरात महाप्रसाद, भोजनदान, भजन कीर्तन व इतरही उत्सव सुरु असतात.
परंतु सर्व पर्यटन क्षेत्राला एकसुत्रात बांधून त्यांचा विकास करावा असा दृष्टीकोण रुढ होवू शकला नाही. पवनीचा मागासलेपण अद्यापही कायम आहे. तालुक्याचे ठिकाण असले तरी दर्जेदार व उच्च शिक्षण मिळेल अशा शाळा महाविद्यालय नाही. तंत्रशिक्षणाची सोय नाही. वैद्यकीय शिक्षण तर नाहीच.
पर्यटन व शिक्षण असे दोन पर्याय पवनी गावाला विकासाच्या वाटेवर घेवून जावू शकत असल्याने लोकप्रतिनिधींनी इच्छाशक्ती ठेवून पवनीच्या विकासाचा आराखडा तयार करण्याची गरज आहे.

Web Title: Waiting for Pavnila tourism development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.