शेतीच्या उत्थानासाठी १.३८ कोटींच्या आराखड्याला निधीची प्रतीक्षा

By Admin | Updated: December 4, 2014 23:04 IST2014-12-04T23:04:10+5:302014-12-04T23:04:10+5:30

विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत मोहाडी तालुक्यातील मोहाडी व आंधळगाव कृषी मंडळातील ७ गावांची निवड करण्यात आली आहे. शेततळे, सिमेंट नाला बंधारे, नाला खोलीकरण, पाणी उपसा साधने,

Waiting for the fund for the upliftment of farming of 1.38 crore | शेतीच्या उत्थानासाठी १.३८ कोटींच्या आराखड्याला निधीची प्रतीक्षा

शेतीच्या उत्थानासाठी १.३८ कोटींच्या आराखड्याला निधीची प्रतीक्षा

युवराज गोमासे - करडी (पालोरा)
विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत मोहाडी तालुक्यातील मोहाडी व आंधळगाव कृषी मंडळातील ७ गावांची निवड करण्यात आली आहे. शेततळे, सिमेंट नाला बंधारे, नाला खोलीकरण, पाणी उपसा साधने, ड्रिप व तुषार सिंचन या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांना लाभ व्हावा, या उद्देशाने जून २०१५ पर्यंतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत मोहाडी मंडळाला १०९.७९ लाख रूपये तर आंधळगाव मंडळाला २८.५५ लाख एकूण १ कोटी ३८ लाख ३४ हजार रूपयांची गरज पडणार आहे. अनुदान मागणी आराखडा तयार करून वरिष्ठांना पाठविण्यात आला असला तरी विकास कामांच्या कार्यान्वयासाठी निधीची प्रतिक्षा आहे.
विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रम शासनाने ३ वर्षांसाठी निर्धारित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत मोहाडी तालुक्याची निवड करण्यात आली आहे. मोहाडी तालुका कृषी विभागाला गावांची निवड, कामांची निवड व आराखडा आणि नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्या अंतर्गत मार्च २०१५ अखेर करावयाची कामे व पैशाची तरतुद त्याचप्रमाणे जून २०१५ पर्यंत करावयाची कामे व आर्थिक तरतुद नियोजन करण्यात आले असून अनुदान मागणी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मोहाडी मंडळातील पांजरा, बोरगाव, खडकी, ढिवरवाडा आदी ४ गावांची निवड करण्यात आली आहे तर आंधळगाव मंडळातील काटेबाम्हणी, विहिरगाव, भिकारखेडा आदी ३ गावांची निवड करण्यात आली आहे. प्रती मंडळ कार्यालय एक हजार हेक्टर शेतीला लाभ देण्याचे उद्दिष्टये या कार्यक्रमात ठरविण्यात आले आहे. या कार्यक्रमात मृद संधारण्याच्या कामांना प्राधान्यक्रम देत आले असून शेतकऱ्यांच्या सहभागावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
पाणलोट असलेल्या शेतांमध्ये शेततळे खोदणे, नाल्यावर सिमेंट बंधारे बांधणे, नाला खोलीकरण व उपसा आदी कामे घ्यावयाची आहेत. शेततळ्यांची कामे शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर करावयाची आहेत. शेतीसाठी पाण्याचा उपसा करता यावा यासाठी डिझेल पंप, इलेक्ट्रिक मोटर, पाईप तर सुक्ष्म सिंचन करता यावे यासाठी ड्रिप व तुषार सिंचन संच ७५ टक्के अनुदानावर अल्प, अत्यल्प आणि महिला शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. उर्वरित शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान राहणार आहे.
जून २०१५ अखेर पर्यंत १ कोटी ३८ लाख ३४ हजार रूपयांची विकास कामे ७ गावांत करावयाची आहेत. विकास कामांची यादी आणि आराखडा तयार झालेला असून अनुदान मागणी प्रस्ताव कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेला आहे.
निधीच्या उपलब्धतेनुसार विकास कामांना गती येणार आहे. प्रकल्पात समाविष्ट गावातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संपर्कात राहण्याची गरज आहे. विकास कामांमुळे मोहाडी तालुक्यातील सिंचनाची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. मोहाडी मंडळ कृषी कार्यालयाने विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत जून २०१५ पर्यंत नियोजित ४ गावांत करावयांच्या विकास व सिंचन कामांसाठी अनुदानाची मागणी केली आहे.
जून २०१५ अखेर पर्यंतची कामे निधीच्या उपलब्धतेनुसार पूर्ण झाल्यानंतर ठरविलेल्या उदिष्यांनुसार उर्वरित शिल्लक २ शेततळे, ३ सिमेंट नाला बंधारे, ३ नाला सरळीकरण तसेच शेतजमिनीमध्ये ड्रिप व तुषत्तर सिंचनाची कामे पूर्ण करण्यात येईल. आराखड्यानुसार निधीची मागणी करण्यात आली असली तरी सध्यातरी विकास कामांना अनुदान रक्कमेची प्रतिक्षा आहे.

Web Title: Waiting for the fund for the upliftment of farming of 1.38 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.