पोलीस तपासावर गावकऱ्यांचा अविश्वास
By Admin | Updated: December 29, 2014 01:01 IST2014-12-29T01:01:00+5:302014-12-29T01:01:00+5:30
तालुक्यातील खुटसावरी येथे ६ डिसेंबरला झालेल्या हत्या प्रकरणात मोहाडी पोलिस तपास योग्यरित्या करीत नसुन गावकऱ्यांचे म्हणणे ऐकायला तयार नाहीत.

पोलीस तपासावर गावकऱ्यांचा अविश्वास
मोहाडी : तालुक्यातील खुटसावरी येथे ६ डिसेंबरला झालेल्या हत्या प्रकरणात मोहाडी पोलिस तपास योग्यरित्या करीत नसुन गावकऱ्यांचे म्हणणे ऐकायला तयार नाहीत. आरोपी महिलेने केलेले दुष्कृत्य बघून तिला जामिन मिळाल्या नंतर गावात राहु देणार नाही. सर्व आरोपिंना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, खुटसावरी येथे पोलिसांची गस्त सुरू करावी आदी मागण्या खुटसावरी येथील गावकऱ्यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केल्या आहेत.
पत्र परिषदेला सरपंच देवदास लिल्हारे, तंटामुक्ती अध्यक्ष विजयकुमार पशिने, मिलींद लोणारे, निलुबाई बशिने, बचत गट अध्यक्षा रत्नमाला लिल्हारे, वासुदेव धांडे, रविंद्र धांडे, हिरामण धांडे, लिलाधर वैद्य, तारा उके, रविशा धांडे, गुलाब सेलोकर, शंकर दमाहे सह गावातील नागरिक व बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवुन आरोपींना २४ तासात अटक केली. त्या बद्दल त्यांचे कौतुक करावे से वाटते. मात्र त्यानंतर चौकशीत पोलीसांनी वेळकाढु धोरण अवलंबिले. हत्या झाली त्या दिवशी मृतकाचा साळा घरी होता व त्यानेच खुन झाल्याचे सकाळी सांगितले. मात्र त्याची चौकशी न करता त्याला सोडण्यात आले. मृतकाचा मोबाईल पोलीसांना हस्तगत करता आला नाही. मृतकाच्या पत्नीने आपली साडी लपवून ठेवली होती व त्या साडीवर रक्ताचे डाग होते हे काही गावकऱ्यांनी पाहिले आहे. त्या दिशेने तपास करण्यात आला नाही. मृतकाकडे गळ््यातील गोफ, मंगळसूत्र, दोन आंगठ्या, टॉप्स होते ते कुठे गेले हे पोलीसांनी तपासून बघितले नाही. ते दागीने पोलिसांनी मिळवून द्यावे. मृतकाच्या साळ्याने मोटारसायकल घेवून गेला ती मोटारसायकल मिळवून याची खबरदारी घ्यावी, तसेच या प्रकरणाचा निकाल जलदगतीने लावून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. मृतकाच्या तीन वर्षीय मुलीला शासकीय मदत देण्यात यावी, मातामाय मंदिरात हत्या झाल्याने या मंदिराचे शासकीय खर्चाने शुध्दीकरण करण्यात यावे. तसेच या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा. गावातील प्रत्यक्षदर्शीचे बयाण घेण्यात आलेले नाहीत ते बयाण लवकर घेण्यात यावे. बिट अंमलदार चोपराम निरगुळे यांनी गावात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावे आदी मागण्या पत्रपरिषदेत करण्यात आल्या. या मागण्या मंजूर झाल्या नाही तर संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. या प्रकरणात गावकऱ्यांत मोठा रोष असल्याचे जाणवत होते. (शहर प्रतिनिधी)