The villagers converge for canal repair | कालवा दुरुस्तीसाठी ग्रामस्थ एकवटले

कालवा दुरुस्तीसाठी ग्रामस्थ एकवटले

ठळक मुद्देवाकेश्वरच्या नागरिकांचा पुढाकार : पाटबंधारे विभागाच्या मदतीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धानाच्या गर्भावस्थेत पाण्याची नितांत गरज असून वाकेश्वर येथील अनेक शेतकरी पाटबंधारे विभागाकडे पाण्याच्या अपव्यय टाळण्यासाठी विनवणी करीत आहे. परंतु अनेक वर्षाचा कालावधी लोटूनही रावणवाडी कालव्याची दुरुस्ती न झाल्याने गावकऱ्यांनी कंटाळून स्वत: लोकवर्गणीतून कालव्याची दुरुस्ती केली आहे. काही प्रमाणात तरी पाण्याचा अपव्यय टळला आहे. मात्र तरीदेखील सुस्ताव्यवस्थेत झालेल्या पाटबंधारे विभागाला जाग आलेली दिसून येत नाही.
अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी असतांना देखील यातून मार्ग निघत नसल्याने गावातील बापू डहाके यांनी पुढाकार घेत गावकºयांना मनातील संकल्पना बोलून दाखविली. त्यानुसार गावातील मंदिरात एकत्र येत अनेकानी लोकवर्गणी जमा करुन स्वत: पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पुढाकार घेतला. गावातील गावकºयांच्या पुढाकाराने मुख्य कालव्या वितरिकेला पडलेल्या भगदाडासह इतर ठिकाणच्या दुरुस्तीसाठी जेसीबी बोलावून स्वत: गावकऱ्यांनी श्रमदान करत दोन दिवसात काम पूर्ण केले. गावातील अनेक तरुणांनी यामध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला.
गावकºयांनी तात्पुरत्या स्वरुपाची जरी दुरुस्ती केली असली तरी लाखो लिटर होणारा पाण्याच्या अपव्यय थांबविण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सरकार पाणी अडवा पाणी जिरवासाठी जनजागृती करीत असले तरी देखील वाकेश्वर येथील गावकऱ्यांनी स्वत:चा आचरणातून कालव्याची दुरुस्ती करीत प्रशासनापुढे एक आदर्श ठेवला आहे. पाटबंधारे विभागाला आतातरी शेतकऱ्यांच्या दु:खाची जाणीव होणार काय? असा प्रश्न शेतकरी विचारीत आहे.

Web Title: The villagers converge for canal repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.