लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नाग नदीचे प्रदूषित पाणी वैनगंगा नदीत मिसळत असल्याने पाणी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वैनगंगा तिरावरील १८६ गावांना याचा फटका बसत असून जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या भंडारा शहरातही नागरिकांना हेच रसायनयुक्त दूषित पाणी प्राशन करावे लागत आहे. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.नागपूर शहरातील प्रदूषित पाणी नाग नदीद्वारे वाहून येते. नागनदीत आंभोराजवळ वैनगंगा नदीला मिळते. गोसे प्रकल्पानंतर नाग नदीचे पाणी बॅक वॉटरमध्ये मोठ्या प्रमाणात संग्रहित होते. प्रदूषित पाण्यामुळे वैनगंगेचे पाणीही दूषित झाले आहे. नागनदी नागपूर शहरातील गटाराचे पाणी वाहून आणते. तसेच विविध कारखान्यांचे रसायनयुक्त पाणीही असते. त्यामुळे वैनगंगा नदी गत काही वर्षांपासून दूषित होत आहे. या दूषित पाणी प्राशनाने त्वचारोग, पोटाचे आजार, डायरिया आदी रोगांची लागण नदीतिरांवरील गावांमध्ये दिसून येत आहे.नागनदीच्या शुद्धीकरणासंदर्भात पर्यावरण प्रेमींनी अनेकदा आवाज उठविला. परंतु अद्यापही नाग नदीचे दूषित पाणी येणे थांबले नाही. या दूषित पाण्यामुळे विविध गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.प्रदूषित पाण्यातील मासोळी सेवनाने आजाराची शक्यता आहे. ढिवर समाजाच्या व्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे वैनगंगेचे पाणी सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात सोडले जाते. यामुळे शेतीपिकांच्या माध्यमातून रासायनिक घटक नागरिकांपर्यंत पोहचण्याची भीती निर्माण झाली आहे. भंडारा शहरातही नळावाटे प्रदूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. प्रदूषित विषारी पाण्यापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी नाग नदी शुद्धीकरण मोहीम राबविण्याची गरज आहे. परंतु राजकीय ईच्छाशक्तीचा अभाव दिसतो.प्रदूषण रोखण्यासाठी उपायांची गरजनागपूर शहरातून येणारे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने प्रदूषण निर्मूलन प्रोजेक्ट तयार करण्याची गरज आहे. नाग नदीवर छोटे बंधारे बांधून दूषित पाणी शुद्ध करूनच सोडण्याची आवश्यकता आहे. क्रिस्टल प्रक्रिया करून पाणी सोडावे अशी मागणी आहे. किंवा वैनगंगा नदीला प्रदूषित करणाऱ्या नाग नदीचा प्रवाह इतरत्र वळविण्याची मागणी होत आहे.केंद्रीय मंत्र्यांना निवेदननाग नदीच्या प्रदूषणाबाबत वैनगंगा जलप्रदूषण निर्मूलन समितीने केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात वैनगंगेच्या जलप्रदूषणाचा स्तर नेमका किती आहे याची तपासणी करावी. प्रभूषण बोर्ड भंडारा येथे सुरु करावा, नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजना आहे परंतु जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. राज्यशासनाने यावर योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी समितीचे अध्यक्ष सत्तार खान यांनी केली आहे.
नाग नदीच्या दूषित पाण्याचा १८६ गावांना बसतो फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:40 IST
नाग नदीचे प्रदूषित पाणी वैनगंगा नदीत मिसळत असल्याने पाणी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वैनगंगा तिरावरील १८६ गावांना याचा फटका बसत असून जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या भंडारा शहरातही नागरिकांना हेच रसायनयुक्त दूषित पाणी प्राशन करावे लागत आहे.
नाग नदीच्या दूषित पाण्याचा १८६ गावांना बसतो फटका
ठळक मुद्देभंडाऱ्यात दूषित पाणी : रसायनयुक्त पाण्याने आजार बळावले