पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप
By Admin | Updated: June 28, 2014 23:25 IST2014-06-28T23:25:05+5:302014-06-28T23:25:05+5:30
उन्हाळ्याच्या सुटीनंतर गुरुवार २६ जूनला शाळेची घंटा वाजली. सर्वत्र पाठ्यपुस्तके देऊन व पुष्पगुच्छाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात असताना सालेवाडावासीयांनी पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकून रोष

पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप
प्रशासनाची दिरंगाई : इमारतीसाठी सालेवाडावासीयांचे आंदोलन
अड्याळ : उन्हाळ्याच्या सुटीनंतर गुरुवार २६ जूनला शाळेची घंटा वाजली. सर्वत्र पाठ्यपुस्तके देऊन व पुष्पगुच्छाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात असताना सालेवाडावासीयांनी पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकून रोष व्यक्त केला.
पवनी तालुक्यातील केसलवाडा गटग्रामपंचायत अंतर्गत सालेवाडा येथे १ ते ४ वर्ग असून २५ विद्यार्थी शिकत आहेत. येथील इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने मागील तीन वर्षापासून प्रसुतीगृहाच्या एका खोलीत चारही वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे गिरवीत आहेत. नवीन इमारत संबंधाने तीन वर्षात ग्रामशिक्षण समितीने ठराव घेऊन शिक्षण विभागाकडे पाठविला. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.
इमारतीअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असताना प्रशासन गंभीर नसल्याने पहिल्याच दिवशी आंदोलन करुन विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला. शाळेच्या पहिल्याच दिवशी सरपंच गौतम गोंडाणे, शाळा समितीचे सभापती रंजन वाढवे, छावा संग्रामचे मुनीर शेख, नितीन वरगंटीवार, विनोद गंधे, ग्रामपंचायत सदस्य व शिक्षण समिती सदस्यांच्या नेतृत्वात पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. सकाळी मुख्याध्यापिका थाटकर व शिक्षक आंधळे शाळेत आले असता आंदोलनकर्त्यांनी प्रश्नाचा भडीमार केला. त्यांनी गटशिक्षणाधिकारी तिडके व केंद्रप्रमुख अणेराव यांना माहिती देताच ते सालेवाडा गाठून पालकांची समजूत घातली. त्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.(वार्ताहर)