नैसर्गिक शेतीतून भाजीपाला उत्पादन
By Admin | Updated: December 7, 2015 05:03 IST2015-12-07T05:03:52+5:302015-12-07T05:03:52+5:30
तालुक्यातील सालेबर्डी येथील प्रयोगशील शेतकरी कुशल टिचकुले यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून भाजीपाल्याचे

नैसर्गिक शेतीतून भाजीपाला उत्पादन
भंडारा : तालुक्यातील सालेबर्डी येथील प्रयोगशील शेतकरी कुशल टिचकुले यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेतले.
नैसर्गिक शेतीतज्ज्ञ हेमंत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भंडारा यांचे वतीने कुशन टिचकुले मौजा सालेबर्डी यांचे शेतावर दोन दिवसीय नैसर्गिक शेती कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेला भंडारा जिल्ह्यातील सुमारे १५० शेतकरी उपस्थित होते. झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे महत्त्व, मूलभूत तत्त्वे व फायदे याबाबत विजेंद्र बरबटे, नैसर्गिक शेतीतज्ज्ञ यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शनादरम्यान बरबटे यांनी नैसर्गिक शेतीचे प्रमुख घटक बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत आदी नैसर्गिक निविष्ठा शेतकऱ्यांकडे उपलब्ध सेंद्रिय अवशेषापासून तयार करण्याची पद्धत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना करुन दाखविली.
नैसर्गिक शेतीतज्ज्ञ हेमंत चव्हाण यांनी शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्रात सुमारे २५ प्रकारच्या विविध भाजीपाला लागवडीचे नियोजन करून दाखविण्यात आले. नियोजनाच्या प्रथम टप्प्यात मेथी, पालक, कोथिंबिर, भेंडी व गवार ही पिके तर दुसऱ्या टप्प्यात मिरची, वांगी, फुलकोबी, पानकोबी, नवलगोल, कांदे, झेंडू आदी पिके घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वेलवर्गीय पिकांमध्ये कारली, दोडके, लवकी, काकडी, वाल आदी पिकांना बांबू व दोरीचा आधार देऊन लागवडीचे नियोजन करण्यात आले. सोबतच गाजर व मुळा पिकांचे लागवडीबाबत मार्गदर्शन केले.
हे नियोजन एक एकर शेत्रावर करून झाल्यावर १० बाय १० वर्ग फूट क्षेत्रात दरंभ्यावर शेवगा, एरंडी या पिकांचे नियोजन करण्यात आले. सदर झिरो बजेट नैसर्गिक शेती भाजीपाला मॉडेलचे प्रमुख म्हणजे पिकांना बाहेरील खते व किटकनाशकांच्या मात्रा न देता शेतकऱ्यांच्या शेतावर उपलब्ध असलेल्या संपूर्ण नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर करून बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क आदी निविष्ठा वापर करून विषमुक्त भाजीपाल्याचा जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे, असे आहे. या नियोजनाद्वारे दर आठवड्याला ८०० किलो भाजीपाला उत्पादनाची ढोबळ अपेक्षा असून किमान २० रूपये प्रति किलो या दराने रूपये १६ हजार रुपये विक्री झाल्यास व निविष्ठावरील खर्च शून्य असल्याने ५० टक्के मजुरीवरील खर्च वजा जाता आठवड्याला आठ हजार रूपये तर महिन्याला ३० हजार रूपये निव्वळ शाश्वत नफा गृहीत धरता येईल. शेती क्षेत्रातून निराश झालेल्या युवा पिढीने केवळ एक एकर क्षेत्रावर नियोजन केल्यास त्यांचे रोजगाराचा मार्ग प्रशस्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचप्रमाणे या कार्यशाळेत मार्गदर्शन घेऊन प्रेरित होऊन जे शेतकरी भाजीपाला मॉडेल उभारतील त्यांचे शेतावर पुढील वर्षभर नियमितपणे अशा कार्यशाळेचेसुध्दा नियोजन करण्यात आले आहे. म्हणून इच्छुक शेतकऱ्यांनी या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक हेमंत चव्हाण, वीरेंद्र बरबटे तसेच आदर्श शेतकरी भदू कायते, दिगांबर मते, नीलेश गाढवे, यशवंत टिचकुले, कुशन टिचकुले, डॉ. तुरसकर व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोळघाटे व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)