माळरानात पिकविला भाजीपाला

By Admin | Updated: November 24, 2015 00:39 IST2015-11-24T00:39:07+5:302015-11-24T00:39:07+5:30

टेकड्यांनी वेढलेल्या कोका जंगलव्याप्त परिसरात आता तंत्रज्ञानाने केलेली प्रायोगिक शेती उदयाला येऊ पाहत आहे.

Vegetable grown in garnish | माळरानात पिकविला भाजीपाला

माळरानात पिकविला भाजीपाला

लोकमत शुभवर्तमान : करडी परिसरात शेतकऱ्यांचा तंत्रज्ञानयुक्त प्रयोग
युवराज गोमासे करडी
टेकड्यांनी वेढलेल्या कोका जंगलव्याप्त परिसरात आता तंत्रज्ञानाने केलेली प्रायोगिक शेती उदयाला येऊ पाहत आहे. बंडू बारापात्रे नामक शेतकऱ्याने डोंगरदेव सारख्या आदिवासी गावात एक - दोन नव्हे तब्बल २८ एकरावर अत्याधुनिक पद्धतीने शेती कसून भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. तोट्याची शेती कशी फायदेशीर ठरू शकते, याचे उदाहरण त्यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे. त्यांची शेती पाहण्यासाठी शेतकरी दूरवरून भेटी देत आहेत. डोंगरदेव व बोरगावातील ४० ते ४५ मजुरांना रोजगार मिळाला आहे.
भंडारा शहरातील भाजीपाला पिकाचे व्यापारी बारापात्रे यांनी काही दिवसांपूर्वी डोंगरदेव शेत शिवारातील, उजाड माळरानातील २८ एकर शेती विकत घेतली. शेती घेताना त्यांनी या परिसरासह भौगोलिक पार्श्वभूमिचा अभ्यास करुन माती परिक्षण करवून घेतले. कृषी तंत्रज्ञ सुधीर धकाते यांची यासाठी मदत घेतली. उंच सखल जमीन समतल करून घेतली. समतलतेसाठी लागणाऱ्या मातीसाठी त्यांनी शेततळा खोदला, त्यातून निघालेल्या मातीचा वापर त्यांनी भरणासाठी केला. लहान शेत मोठे केले. शेतातील निरुपयोगी झाडांना कापून पाणी वितरणासाठी पाईप लाईनचे जाळे पसरविले. पुरेशे पाणी व्हावे, यासाठी ठिबक सिंचन पद्धतीने अंमलात आणली. प्रमाणबद्ध व तंत्रयुक्त, शास्त्रोक्त पद्धतीने पिकांची लागवड केली.
पिकांमध्ये कचरा, जमिनीची धूप व नत्र वाया जावू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टीक मल्चींगचा वापर केला. शेतामध्ये राहून पाहणी व व्यवस्थापन करता यावे, यासाठी फार्महाऊसचे बांधकाम केले. खाली गोदाम तर वरचा मजला राहण्यासाठी उपयोगी ठरत आहे. त्यांनी ड्रीप व मल्चींगवर पाच एकरात करिश्मा व अभिलाष या जातीच्या टमाटर पिकाची लागवड केली आहे. पाच एकरात हरिहर जातीच्या वांगे पिकांची लागवड केली. भेंडी पाच एकरात, कोहळा व मिरची पिकाची सुद्धा प्रायोगिक स्तरावर लागवड केली आहे. भेंडीचा तोडा सुरु झालेला आहे. पुढील आठवड्यात टमाटर पिकाची खेप बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. भाजीपाला पिकांची ते स्वत:च मार्केटिंग करतात. प्रायोगिक शेती वैविध्यामुळे परवडत आहे. योग्य व्यवस्थापन, नियोजन आणि अंमलबजावणी या त्रिसुत्रीमुळे घाट्याची शेती फायद्याची ठरू शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
डोंगरदेव येथील शेतीला नुकतीच मोहाडीचे मंडळ अधिकारी गायकवाड, करडी कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार, खडकी कृषी सहाय्यक रंगारी यांनी भेट देऊन पाहणी केली, मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या योजनांसाठी, पिकांच्या उपाययोजनांसाठी मार्गदर्शन व मदत वेळोवेळी दिली जाईल, असे गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Vegetable grown in garnish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.