ब्लिचिंग पावडरचा वापर कागदोपत्री
By Admin | Updated: August 11, 2014 23:44 IST2014-08-11T23:44:08+5:302014-08-11T23:44:08+5:30
पावसाळा सुरू होवून दोन महिने लोटले असताना ग्रामीण भागात पाणी शुद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन जागरूक नसल्याचे भयावह चित्र पहावयास मिळत आहे.

ब्लिचिंग पावडरचा वापर कागदोपत्री
भंडारा : पावसाळा सुरू होवून दोन महिने लोटले असताना ग्रामीण भागात पाणी शुद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन जागरूक नसल्याचे भयावह चित्र पहावयास मिळत आहे.
ग्रामपंचायत स्तरावर ब्लिचिंग पावडर खरेदी करून वापराने निर्देश असताना जिल्ह्यातील सातही तालुक्यात ब्लिचिंग पावडरचा वापर कागदोपत्रीच दिसत असून निधी लाटण्याचा प्रयत्नासह नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे तर काही ग्रामपंचायती याला अपवाद असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात ८७५ गावे असून ५६५ पेक्षा जास्त ग्रामपंचयती आहेत. ग्रामपंचायतीमध्ये शासनाची पाणीपुरवठा योजना सुरू आहे. यातील पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली कार्यान्वित आहेत. मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील विहिरी, पाणवठ्यांमध्ये नवीन पाणी आले आहे. हे पाणी शुद्ध करणे गरजेचे आहे.
या पाण्यातून जंतू संसर्ग होवून साथीचे रोग पसरण्याची भिती असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विहिरी व इतर पाण्याच्या स्त्रोतामध्ये ब्लिचिंग पावडर टाकल्या जात नसल्याने अनेक गावांमध्ये नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. ब्लिचिंगमुळे पाण्याची चव बदलते, अन्न लवकर शिजत नसल्याच्या भ्रामक कल्पनाही खेड्यांमध्ये पसरविल्या जात असून त्यामध्ये तथ्य नसल्याचे सांगणे, जरूरीचे वाटते. योग्य प्रमाणात ब्लिचिंगचा वापर केल्यास पाणी शुद्ध होऊन पिण्यास योग्य होते. मात्र सध्या ब्लिचिंग पावडरचा वापर कागदोपत्रीच दिसत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)