युरियाचा काळाबाजार
By Admin | Updated: September 11, 2014 23:17 IST2014-09-11T23:17:23+5:302014-09-11T23:17:23+5:30
विरली बु. या परिसरात युरियाची टंचाई असून काही मोजक्या कृषी केंद्र चालकांकडे युरिया उपलब्ध असल्याने त्यांनी युरियाचा काळाबाजार सुरु केला असून शेतकऱ्यांची लूट चालविली आहे.

युरियाचा काळाबाजार
विरली(बु.) : विरली बु. या परिसरात युरियाची टंचाई असून काही मोजक्या कृषी केंद्र चालकांकडे युरिया उपलब्ध असल्याने त्यांनी युरियाचा काळाबाजार सुरु केला असून शेतकऱ्यांची लूट चालविली आहे. दरम्यान कृषी विभागाने युरियाचा पुरवठा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची लागवड असून सद्यस्थितीत धान गर्भावस्थेत आहेत. अशा वेळी धानशेतीला युरियाची नितांत गरज असते. मात्र या परिसरात पुरेशा प्रमाणात युरियाचा पुरवठा न झाल्याने युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी ज्या काही मोजक्या कृषी केंद्रामध्ये युरियाचा साठा होता त्यांनी शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत युरियाच्या बॅग विकून शेतकऱ्यांची गळचेपी चालविली आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कृषी विभागाने भंडारा जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली. मात्र सद्यस्थितीवरून कृषी विभागाचे पितळ उघडे पडले असून शेतकऱ्यांना युरियासाठी वणवण भटकावे लागत आहे.
युरियाची बॅगची किंमत ३२० रु. आहे. मात्र काही कृषी केंद्र चालकांनी ४०० ते ४५० रु. पर्यंत युरिया विकून आपले उखळ पांढरे करून घेतले. या केंद्र चालकांना खरेदीची पावती मागल्यास तुला युरिया पाहिजे की पावती? असा प्रतिप्रश्न करून शेतकऱ्यांना चूप केले जाते. त्यामुळे या काळाबाजारी कृषी केंद्र चालकांवर कृषी विभागाचे भरारी पथक काय आणि कशी कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान कृषी विभागाने या परिसरात त्वरीत युरियाचा पुरवठा करून शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)