मोटरसायकल नालीत कोसळून दोन तरुण ठार; लाखनी तालुक्यातील रेंगेपारची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 11:01 IST2021-11-20T11:01:05+5:302021-11-20T11:01:16+5:30
मोटरसायकलवरील नियंत्रण गेल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत दोघेही मोटरसायकलसह कोसळले.

मोटरसायकल नालीत कोसळून दोन तरुण ठार; लाखनी तालुक्यातील रेंगेपारची घटना
लाखनी(भंडारा) : बहिणीकडून भाऊबिजेची ओवाळणी करून गावी परत येत असताना मोटारसायकल नालीत पडून दोन तरुण ठार झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली. जखमी अवस्थेत रात्रभर दोघेही नालीत पडून राहिल्याने मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.
राकेश केवळराम देशमुख (२८) आणि महेश जगदीश कामथे (३२) दोघेही रा. रेंगेपार (कोहळी) ता. लाखनी अशी मृतांची नावे आहे. साकोली तालुक्यातील शिवनीबांध येथे हे दोघे महेशच्या बहिणीच्या घरी शुक्रवारी गेले होते. भाऊबिजेची ओवाळणी करुन रात्री मोटरसायकलने भुगावमार्गे गावी परत येत होते.
मोटरसायकलवरील नियंत्रण गेल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत दोघेही मोटरसायकलसह कोसळले. रात्रीची वेळ असल्याने कुणालाही अपघाताची माहिती मिळाली नाही. दोघेही रात्रभर नाल्यात पडून राहिल्याने. त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्री दोघेही मृतावस्थेत दिसून आले. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.