मान्यताविना कामांच्या देयकांचे दोनदा वाटप
By Admin | Updated: July 23, 2014 23:27 IST2014-07-23T23:27:48+5:302014-07-23T23:27:48+5:30
मग्रारोहयोच्या पालोरा येथील १५ लक्ष रुपयांच् या दोन सिमेंट रस्त्यांना जानेवारी २०१४ रोजी बिडीओंनी तांत्रीक व प्रशासकीय परवानगी दिली. त्यानंतर काही दिवसांनीच ६०:४० च्या प्रमाणात कुशल

मान्यताविना कामांच्या देयकांचे दोनदा वाटप
करडी (पालोरा) : मग्रारोहयोच्या पालोरा येथील १५ लक्ष रुपयांच् या दोन सिमेंट रस्त्यांना जानेवारी २०१४ रोजी बिडीओंनी तांत्रीक व प्रशासकीय परवानगी दिली. त्यानंतर काही दिवसांनीच ६०:४० च्या प्रमाणात कुशल अथवा सिमेंट कामे बसत नसल्याचे पत्र ग्रामपंचायतीला देऊन कामे रद्द केली. ग्रामपंचायतीने पुन्हा परवानगी न मागता, अहवाल न देता जुलै २०१४ महिन्यात सिमेंट रस्त्याची कामे केली. मात्र दोन्ही कामांसाठी लागणाऱ्या मटेरियलचे देयक मे व जून २०१४ महिन्यात दिले गेले. सुमारे ३.७५ लाखांच्या देयकांना दोनदा मान्यता दिली. ती कशी व कोणत्या भूमिकेतून दिली या प्रकरणी चौकशी होण्याची गरज आहे.
मोहाडी तालुक्यातील पालोरा येथे सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात मग्रारोहयोची कामे झाली नाहीत. त्यामुळे गावात सदर वर्षात कुशल व अकुशल कामांचे प्रमाण ६०:४० च्या प्रमाणात बसत नव्हते. असे असतानाही संगनमताने १५ लक्ष रुपयांच्या दोन सिमेंट रस्त्यांच्या कामांना मान्यता दिली गेली. दोन्ही कामांसाठी खंड विकास अधिकाऱ्यांनी अनुक्रमे ४ व ६ जानेवारी २०१४ रोजी तांत्रीक व प्रशासकीय मान्यता दिली. झालेली गंभूर चूक लक्षात येताच बिडीओंनी २० जानेवारी २०१४ रोजी पालोरा ग्रामपंचायतीला पत्र देऊन कामे ६०:४०च्या प्रमाणात बसत नसल्याचे कारण देत सिमेंट रस्त्याची कामे रद्द केली. तांत्रिक अभियंत्यासह अंदाजपत्रकांची तपासणी करून प्रमाणपत्राबाबत अहवाल द्यावा, प्रशासकीय मान्यता घेऊनच कामे करावी, अन्यथा सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील, अशी स्पष्ट सूचनाही पत्रातून दिली गेली.
मात्र ग्रामपंचायतीने पत्राला केराची टोपली दाखवित बिनबोभाटपणे जुलै २०१४ च्या पहिल्या आठवड्यात सिमेंट रस्त्याच्या कामांना सुरुवात केली. एक काम पूर्ण झाले व दुसरे काम अपूर्ण असताना ग्रामपंचायतीने काम बंद केले. त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. भय्या कनोजकर ते गणेश कुकडे या रस्त्यासाठी ६ लाख तर अंजनाबाई बारस्कर (साकोली रस्ता) ते सतीश गिऱ्हे या रस्त्यासाठी ९ लाख असा १५ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता.
असे झाले देयकाचे वाटप
सिईओंनी ६०:४०च्या प्रमाणात कामे बसत नसल्याचे कारण देत पालोरा येथील दोन्ही सिमेंट रस्त्यांचे काम रद्द केले. ग्रामपंचायतीने सुद्धा पुन्हा परवानगी घेतली नाही. मात्र दोन्ही कामे धडाक्यात केली. कामांना ३० मे २०१४ रोजी २.१५ लाख तर १९ जून २०१४ रोजी १.५० लाखाचा निधी देयकांसाठी मंजूर झाला. सदर निधी सिमेंट रस्त्याच्या मटेरियलसाठी दिला गेल्याने एकूण ३.७५ लाखाची देयके ग्रामपंचायतीने मटेरियल सप्लायरला दिले.
कामांना देयकांसाठी निधी कोणी, कसा व कोणत्या भूमिकेतून दिला. यासाठी मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता असल्याने चौकशी होणे गरजेचे आहे. कामांसाठी रोहयो मस्टरही पंचायत समिती स्तरावरून दिले गेले. त्यासाठी कुणी व केव्हा मंजुरी दिली याची चौकशी होणे तेवढेच गरजेचे आहे. (वार्ताहर)