दोन लाख मजुरांना मिळाला रोजगार
By Admin | Updated: August 16, 2014 23:18 IST2014-08-16T23:18:31+5:302014-08-16T23:18:31+5:30
जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १२६ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत ८२७ रुग्णांना लाभ देण्यात आला असून रोजगार हमी

दोन लाख मजुरांना मिळाला रोजगार
रोहयोत भंडारा देशात सातवा : पालकमंत्री मुळक यांचे प्रतिपादन
भंडारा : जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १२६ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत ८२७ रुग्णांना लाभ देण्यात आला असून रोजगार हमी योजनेअंतर्गत २ लाख ४ हजार १३० मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले असून जिल्हा राज्यात प्रथम तर देशात सातव्या क्रमांकावर असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. राजेंद्र मुळक यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी परेडचे निरीक्षण केले. पोलीस, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्रसेना, स्काऊट आणि गाईड यांनी परेड संचलन करुन राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी पुढे बोलताना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात दोन लाख ४ हजार १३० मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, तर देशात सातव्या क्रमांकावर आहे.
राज्यातील गारपीटग्रस्तांना ४ कोटीची मदत राज्य शासनाने केली आहे. सिंदपुरी येथे खाजगी मालगुजारी तलावाची पाळ फुटल्याने १०१ कुटुंबातील ४४५ व्यक्तींना सुरक्षीत ठिकाणी पोहचविले व त्यांना तात्काळ मदत दिली. राजीव गांधी जीवनदायीनी योजनेअंतर्गत १ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील ८२७ रुग्णांना त्याचा लाभ देण्यात आला. यासाठी शासनाने २ कोटी ४४ लाख ४८ हजार ८२० रुपये खर्च केले. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ६ हजार २५६ मातांना लाभ देण्यात आला. त्याचबरोबर प्रसुती मातांना रुग्णालयीन सेवा देण्याकरीता मदत करण्यासाठी ६ हजार ३०९ आशांना त्याच्या कामाचा मोबदला देण्यात आला. सुवर्ण राजस्व अभियान अंतर्गत ई-मोजणी जलद गतीने होण्याच्या दृष्टीने जिह्यात सातही तालुक्यात यंत्राच्या सहाय्याने मोजणीची सुरुवात करण्यात आली आहे.
भंडारा जिल्ह्यात ५ लाख ७ हजार ८९७ सातबाराचे संगणकीकरण करण्यात आले. २ हजार ९६२ गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले असून २८ पैकी १५ गावठाणांना १ आॅगस्टपासून स्वतंत्र महसुली गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे.
बावनथडी प्रकल्पांतर्गत जमिनीवरील विक्री, वाटणी व हस्तांतरणावरील निर्बंंध उठविण्यात आल्याची माहिती दिली. ध्वजारोहण समारंभाला जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी, जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक कैलास कणसे, जिल्हा होमगार्ड समादेशक डॉ.श्रीकांत वैरागडे आदी उपस्थित होते. संचालन निलकंठ रणदिवे, रोहिणी मोहरील यांनी केले. (शहर प्रतिनिधी)