नदीत बुडून दोन बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:35 IST2021-04-25T04:35:08+5:302021-04-25T04:35:08+5:30

खरबी (भंडारा) : आजी-आजोबासोबत नदीवर गेलेल्या दोन बालकांचा बुडून हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथे शनिवारी सकाळी ...

Two children drown in river | नदीत बुडून दोन बालकांचा मृत्यू

नदीत बुडून दोन बालकांचा मृत्यू

खरबी (भंडारा) : आजी-आजोबासोबत नदीवर गेलेल्या दोन बालकांचा बुडून हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथे शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

विक्रम विनोद उके (९) आणि विवेक विनोद उके (८) अशी मृत भावंडांची नावे आहेत. शनिवारी सकाळी आजी आणि आजोबा कपडे धुण्यासाठी गावालगत असलेल्या सांड नदीवर गेले होते. आजी आणि आजोबा कपडे धूत असताना या दोघांनी पाण्यात आंघोळ केली. त्यानंतर दोघेही नदीच्या तिराने चिचबिलाई तोडण्यासाठी गेले. मात्र नदीच्या तीरावरून पाय घसरून कधी पाण्यात पडले हे आजी-आजोबांना कळले नाही. कपडे धुवून झाल्यावर आजोबा ताराचंद उके यांनी नातवांना आवाज दिला. परंतु प्रतिसाद आला नाही. घरी गेले असतील म्हणून त्यांनी घरी येऊन शोधले. परंतु तेथेही दिसले नाही. त्यामुळे लगेच पुन्हा नदीवर गेले. नदीच्या तीरावरून शोध घेत असताना काठावरून घसरल्याच्या खुणा दिसल्या. त्यामुळे त्यांनी पाण्यात उतरून बघितले तर दोघेही गाळात फसलेल्या अवस्थेत आढळून आले. दोघांनाही बाहेर काढले. परंतु तोपर्यंत मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती गावात होताच संपूर्ण गाव नदी तीरावर धावून गेले. या घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना देण्यात आली. विनोद उके यांना ही दोनच मुले होती. दोघाही मुलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने त्यांच्यावर आभार कोसळले.

Web Title: Two children drown in river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.