वाढत्या कोरोना संसर्गामुळे एसटीला दररोजचे बारा लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST2021-04-09T04:37:03+5:302021-04-09T04:37:03+5:30
भंडारा विभागाअंतर्गत ३७१ बसेस आहेत. त्यामध्ये दररोज १६०० बसफेऱ्या सुरू आहेत. जिल्ह्यात ६५९ चालक, तर ५७९ वाहक कार्यरत आहेत. ...

वाढत्या कोरोना संसर्गामुळे एसटीला दररोजचे बारा लाखांचे नुकसान
भंडारा विभागाअंतर्गत ३७१ बसेस आहेत. त्यामध्ये दररोज १६०० बसफेऱ्या सुरू आहेत. जिल्ह्यात ६५९ चालक, तर ५७९ वाहक कार्यरत आहेत. तर तांत्रिक, प्रशासकीय व मेकॅनिकल अशा सर्व विभागांचे मिळून १, ८६० कर्मचारी कार्यरत आहेत.
त्यामुळे एवढ्या मोठ्या कर्मचाऱ्यांचे पगार व दररोजचा एसटीचा वाढता खर्च काढून दुसरीकडे आपले उत्पन्न वाढविण्यासाठी एसटी महामंडळाचे अधिकारी आपला जीव धोक्यात घालून नवनवीन उपाय योजना आखत आहेत. त्यामध्ये शासकीय कार्यालयांच्या वाहनांची दुरुस्ती, एसटीची मालवाहतूक असे वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. यासाठी प्रतिसादही चांगला मिळत असला, तरी कोरोनापूर्वी सुरू असलेल्या प्रवासी वाहतुकीची सर येऊ शकत नाही. त्यामुळे कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून एसटी बंद होती. त्यामुळे खूप मोठा फटका एसटी महामंडळाला संपूर्ण राज्यभरात सहन करावा लागला होता. त्यातच आता पुन्हा एकदा राज्यात कोरोना संसर्ग वाढत चालल्याने पुन्हा तोटा वाढत चालला आहे.
बॉक्स
आजही लालपरीच्या दररोज सोळाशे बसफेऱ्या
कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. मात्र तरीही शासनाच्या निर्देशांचे पालन करून प्रवाशांना सातत्याने मार्गदर्शन करीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आजही सोळाशे बसफेऱ्या भंडारा विभागात दररोज सुरू आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागातील काही बसफेऱ्या रद्द झाल्या असल्या तरीही आज भंडारा, नागपूर, गोंदिया, तुमसर, मोहाडी, पवनी, साकोली अशा विविध बस फेऱ्यातून कर्मचाऱ्यांचे पगार, खर्च काढण्यासाठी एसटीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र लांब पल्ल्याच्या बसेस बंद असल्याने एसटीचे मोठे नुकसान होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोनापूर्वी राज्यात भंडारा विभाग राज्यात अव्वल
संपूर्ण राज्यभरात भंडारा विभागाचे उत्पन्न चांगले होते. याबाबत विभागीय नियंत्रक विनय गव्हाळे यांचे मुंबई कार्यालयात भंडारा एसटी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे कामाचे कौतुक करण्यात आले होते. मात्र आता राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढत चालल्याने पुन्हा एसटीचे उत्पन्न घटले आहे. एसटी महामंडळासाठी कोरोना संसर्ग हा कर्दनकाळ ठरत आहे. गतवर्षी चार-पाच महिने एसटी बंद असल्याने कोटी रुपयांचे एसटीचे उत्पन्न घटले होते. त्यानंतर पुन्हा जून महिन्यात एसटी पुन्हा धावू लागली. मात्र तरीही महामंडळाला नुकसान सहन करावे लागले होते. याचा परिणाम कोरोना संसर्ग एसटीसाठी जणूकाही कर्दनकाळ ठरला आहे
कोट
कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रवासी संख्या निश्चितच काहीअंशी घटली आहे; मात्र तरीही प्रवाशांची कुठेही गैरसोय होऊ नये, यासाठी आजही अनेक मार्गांवरील बसफेऱ्या सुरू आहेत. यासोबतच एसटीची मालवाहतूक सेवाही सुरू आहे. याचा उद्योजकांनी लाभ घ्यावा. यासोबतच कोरोनाबाबत विविध उपाययोजना व मार्गदर्शन करीत आम्ही प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे.
डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा